आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) कार्यकारिणी सदस्यांना लाच देऊन २००६च्या विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद मिळवल्याच्या आरोपानंतर जर्मन फुटबॉल महासंघाचे (डीएफबी) अध्यक्ष वोल्फगँग निएर्सबॅच यांनी पदाचा राजीनामा दिला. फ्रँकफुर्ट येथे डीएफबी स्थायी समितीची तत्काळ बैठक बोलावून निएर्सबॅच यांनी ही घोषणा केली. त्याच वेळी २००५च्या सुरुवातीला डीएफबीच्या खात्यातून फिफाला ६.७ दशलक्ष युरो हस्तांतरित करण्यात आल्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘‘२००६च्या विश्वचषक आयोजन समितीचे सदस्य म्हणून विपणन, प्रसारमाध्यम प्रमाणन आणि स्पर्धा आयोजनाचे काम योग्यरीतीने आणि जबाबदारीने पार पाडले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही,’’ असे मत निएर्सबॅच यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे. दरम्यान, डीएफबीवर झालेल्या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
निएर्सबॅच यांनी मार्च, २०१२ मध्ये डीएफबीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. ‘‘त्या आयोजन लिलाव प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो. तरीही आरोपांच्या फैरी माझ्यावर झाडल्या गेल्या, याची खंत वाटते,’’ असे निएर्सबॅच यांनी सांगितले.