भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर खेळणार की नाही, याबाबत साशंकता असली तरी प्रशिक्षक मिकी आर्थर यांना त्याच्या खेळण्याबाबत विश्वास आहे. अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे वॉर्नर दोन्ही सराव सामन्यांत खेळू शकला नव्हता. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त असेल की नाही, हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.
‘‘येत्या एखाद-दोन दिवसांमध्ये वॉर्नर या दुखापतीतून किती सावरतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो सराव करत आहे. फिरकी गोलंदाजीचा त्याने उत्तम सराव केला असला तरी वेगवान गोलंदाजी खेळण्याचा सराव त्याने केलेला नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की, तो नक्कीच दुखापतीतून बाहेर येऊन पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल,’’ असे आर्थर म्हणाले.
‘‘पहिल्या सामन्यासाठी वॉर्नर तंदुरुस्त ठरला नाही तर ईडी कोवनबरोबर शेन वॉटसन सलामीला येऊ शकतो,’’ असे आर्थर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘जर वॉर्नर पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त वाटला नाही तर कोवनबरोबर वॉटसनला आम्ही सलामीला पाठवू. सराव सामन्यांमध्ये या दोघांनी चांगली सलामी दिली होती. वॉटसन हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे त्याला मधल्या फळीत खेळवायला आम्हाला आवडेल. पण जर वॉर्नर तंदुरुस्त नसेल तर त्याला सलामीला यावे लागेल. भारताला त्यांच्या मातीत पराभूत करणे, हे आमचे पहिले ध्येय आहे. त्यासाठी संघात चांगला समन्वय आणण्याचा प्रयत्न करू.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा