पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णकमाई करणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडूंची बुधवारी आपल्या निवासस्थानी भेट घेतली.

भारताने इतिहास घडवताना प्रतिष्ठेच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक पटकावले. रविवारी झालेल्या अखेरच्या फेरीत भारतीय पुरुष संघाने स्लोव्हेनिया, तर महिला संघाने अझरबैजानचा पराभव करत सुवर्णयश संपादन केले. पुरुष संघात डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, नाशिककर विदित गुजराथी आणि पेंटाला हरिकृष्णा यांचा समावेश होता. महिला संघात द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली, नागपूरची दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव या खेळाडू होत्या. हरिकृष्णा भेटीसाठी उपस्थित राहू शकला नाही. अन्य सर्व खेळाडूंसह प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन (पुरुष संघ) आणि अभिजित कुंटे (महिला संघ) यांच्याशी मोदी यांनी भेट घेतली.

हेही वाचा >>>‘तिने देशाची माफी मागायला हवी…’, विनेश फोगटबद्दल योगेश्वर दत्तचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहित आहे की…’

मोदी यांनी या सुवर्णवीरांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाबरोबर छायाचित्रही काढले. या खेळाडूंनी मिळून पंतप्रधानांना बुद्धिबळाचा पट (चेस बोर्ड) भेट दिला. यावर प्रज्ञानंद आणि एरिगेसी यांच्यात झटपट लढत झाली, जी मोदी यांनी या दोघांच्या शेजारीच उभी राहून पाहिली.

एआयसीएफ’कडून रोख पारितोषिक

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) ऑलिम्पियाड विजेत्या संघांना ३.२ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला २५ लाख, तर दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार असल्याचे ‘एआयसीएफ’चे अध्यक्ष नितीन नारंग यांनी सांगितले. तसेच भारतीय पथकाचे प्रमुख ग्रँडमास्टर दिबयेंदू बरुआ यांना १० लाख, तर साहाय्यक प्रशिक्षकांना ७.५ लाख रुपये दिले जातील.

पंतप्रधानांना भेटण्यासाठी विदितची स्पर्धेकडे पाठ

ऑलिम्पियाड संपल्यानंतर भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी अझरबैजान येथील वुगर गाशिमोव स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार होता. मात्र, पंतप्रधान मोदी ऑलिम्पियाड विजेत्या संघांची भेट घेणार असल्याचे कळताच त्याने स्पर्धेकडे पाठ फिरवत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. ‘‘मी बाकूमध्ये दाखल झालो होतो आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतीय संघाला सन्मानित करणार असल्याचे मला समजले. हे ऐकून मी खूप खूश झालो. मला या भेटीचा भाग व्हायचे होते. त्यामुळे मी अझरबैजान येथील स्पर्धेचे संयोजक सरखान गाशिमोव यांच्याशी त्वरित संपर्क साधला आणि त्यांनी मला समजून घेतले. त्यांचे खूप आभार. माझ्या जागी अरविंद चिदम्बरमला खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याला शुभेच्छा,’’ असे विदितने ‘एक्स’वर लिहिले.