सिडनी : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) काही हंगामांना मुकावे लागले याचे मला शल्य नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आणि खेळातील सुधारणेसाठी मला ते खूप फायदेशीर ठरल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केले.
गेल्या आठवडयात झालेल्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलावात स्टार्कवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने तब्बल २४.७५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती. त्यामुळे तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. स्टार्कने २०१५ सालापासून ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवलेला नाही. असे असले तरी ‘आयपीएल’मधील संघ त्याला खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक दिसले.
हेही वाचा >>> ट्वेन्टी-२० संघातील निवडीबाबत रियाझकडून बाबर, रिझवानला शाश्वती
‘‘क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून कुटुंबासाठी वेळ काढणे फार अवघड जाते. त्यात माझी पत्नीही (एलिसा हिली) क्रिकेटपटू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने नसताना मी एलिसा आणि कुटुंबासोबत जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. तसेच मी माझ्या शरीरावर लक्ष देतो, जेणे करून मला ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकेल,’’ असे स्टार्क म्हणाला.
‘‘मला बराच काळ ‘आयपीएल’मध्ये खेळता आलेले नाही, पण याचे मला शल्यही नाही. पैसा महत्त्वाचा आहे, पण मी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. याचा मला खेळातील सुधारणेसाठी आणि विशेषत: कसोटीतील कामगिरी उंचावण्यासाठी खूप फायदा झाला आहे,’’ असेही स्टार्कने सांगितले. ‘आयपीएल’मध्ये स्टार्कच्या नावे २७ सामन्यांत ३४ बळी आहेत. त्याने २०१४ आणि २०१५च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे प्रतिनिधित्व केले होते. पुढील वर्षी तो कोलकाता संघाकडून खेळताना दिसेल.