रायपूर : पृथ्वी शॉ (१८५ चेंडूंत १५९ धावा) व भूपेन लालवानी (१०२ धावा) या सलामीवीरांच्या शतकांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यातील पहिल्या दिवसअखेर छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात ४ बाद ३१० धावसंख्येपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सूर्यांश शेडगे (१७) व हार्दिक तामोरे (१) खेळत होते.
सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अजिंक्य रहाणेचा निर्णय सलामीवीरांनी सार्थकी ठरवीत मुंबईला आक्रमक सुरुवात दिली. पुनरागमन करणाऱ्या पृथ्वीने छत्तीसगडच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरत चौकार व षटकांची आतषबाजी केली. त्याने आपल्या खेळीत १८ चौकार व तीन षटकार लगावले. भूपेनही पृथ्वीला चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूने सांभाळून खेळताना त्याने १० चौकारांच्या मदतीने आपले शतक साजरे केले. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी २४४ धावांची भक्कम भागीदारी केली. पृथ्वीला विश्वास मलिकने बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली.
हेही वाचा >>>“माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका”, रवींद्र जडेजाने वडिलांना सुनावलं, नेमकं प्रकरण काय?
यानंतर मैदानात आलेल्या अमोघ भटकळने (१६) संयमाने खेळ केला. मात्र, आशीष चौहानने त्याला बाद करीत मुंबईला दुसरा झटका दिला. कर्णधार अजिंक्य रहाणे (१) खराब कामगिरी या सामन्यातही सुरूच राहिली. चौहाने त्याला बाद केले. यानंतर भूपेनने काही चांगले फटके मारीत मुंबईची धावसंख्या ३०० पर्यंत नेली. मग, चौहानने त्याला माघारी धाडले. आता दुसऱ्या दिवशी मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे.
पृथ्वीने दुखापतीतून सावरल्यानंतर सहा महिन्यांनी बंगालविरुद्धच्या गेल्या सामन्यात पुनरागमन करताना ३५ धावा केल्या होत्या.
पुजाराचे शतक
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने सध्या सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत दुसरे शतक झळकावले. त्यामुळे सौराष्ट्रने राजस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ४ बाद २४२ धावा केल्या. पुजाराने २३० चेंडूंचा सामना करताना ११० धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान त्याने नऊ चौकार लगावले.