भारताचा स्टार क्रिकेटपटू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सेल्फी घेण्यास नकार दिल्यामुळे त्याच्याशी काही चाहत्यांनी हुज्जत घातली आहे. हे प्रकरण आता थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांविरोधात एफआरआय नोंदवला असून या सपना गिल नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी केले तरुणीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्यामुळे त्याचा चाहत्यांसोबत वाद झाला. या वादातून टोळक्यांनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या कारची तोडफोड केली. सोबतच पृथ्वी शॉशी हुज्जत घातली. यावेळी त्याला मारण्याचाही प्रयत्न झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीच्या हातात बेसबॉलची काठी आहे. ही काठी पृथ्वी शॉ पकडत असल्याचे दिसत आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका तरुणीला अटक केले असून या तरुणीचे नाव सपना गिल आहे. सपना गिलला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
पाहा व्हिडीओ :
नेमंक काय घडलं होतं?
तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव व त्यांचे मित्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. त्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढला, पण ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले.
गाडीची पुढची व मागची काच फोडली
यामुळे संतप्त झालेल्या गिल व ठाकूर यांनी इतर साथीदारांना तेथे बोलावले. तसेच त्यांना आशिष यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा पाठलाग केला आणि लोटस पेट्रोल पंपजवळ बेसबॉल स्टीकने त्यांच्या गाडीची पुढची व मागची काच फोडली. यादव यांच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आणली. तेथेही आरोपींनी यादव यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.