पीटीआय, मुंबई

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघातून वगळण्यात आल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पृथ्वीने इतरांवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. तोच स्वत:चा सर्वांत मोठा शत्रू आहे, अशी बोचरी टीका मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत मुंबईने जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत पृथ्वीने अनेकदा चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर शनिवारपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी पृथ्वीला मुंबईच्या १६ सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही. सलामीवीराच्या स्थानासाठी अंगक्रिश रघुवंशी, आयुष म्हात्रे आणि जय बिस्ता यांना पसंती देण्यात आली. मुंबई संघातून वगळण्यात आल्यानंतर पृथ्वीने समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त करताना ‘देवा, आणखी किती परीक्षा पाहणार आहेस,’ असे लिहिले होते. तसेच त्याने देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमधील आपली कामगिरी अधोरेखित करताना ‘मी आणखी काय केले पाहिजे?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा >>>IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी

याबाबत विचारले असता ‘एमसीए’मधील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पृथ्वीने अधिक शिस्त पाळून तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे म्हटले. ‘‘मुश्ताक अली स्पर्धेत आम्ही जणू १० क्षेत्ररक्षकांसह खेळत होतो. मैदानावर आम्हाला पृथ्वीला लपवावे लागत होते. त्याच्या बाजूने चेंडू गेला, तरी तो अडवणे त्याला अवघड जात होते. फलंदाजीतही शरीरापासून दूर असलेला चेंडू मारताना त्याला अडचण येत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. त्याची तंदुरुस्ती, शिस्त आणि वर्तणूक फार वाईट आहे. आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळा नियम लावू शकत नाही. त्याने इतरांचा स्तर गाठणे आवश्यक आहे,’’ असे ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Virendra Sehwag: वीरेंद्र सेहवागने बदललं शहीद CRPF जवानाच्या मुलाचं आयुष्य, मोफ

‘‘संघातील वरिष्ठ खेळाडूही आता पृथ्वीबाबत तक्रार करू लागले आहेत,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान पृथ्वी अनेकदा रात्रभर पार्टी करायचा आणि सकाळी सहा वाजता हॉटेलमध्ये परत यायचा. त्याने अनेकदा सरावाला दांडी मारली, अशी माहिती आहे.

क्रिकेटपटू म्हणून अलौकिक प्रतिभा असलेला पृथ्वी गेल्या काही काळापासून चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत आहे. बेशिस्त वर्तणूक आणि तंदुरुस्तीबाबत प्रश्न यामुळे त्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांनंतर मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले होते. तसेच ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

‘‘पृथ्वीने त्याचे प्रश्न स्वत:च सोडवले पाहिजेत. आम्ही त्याला सतत साथ देऊ शकत नाही. तो अनुभवी खेळाडू आहे. आम्ही प्रत्येकाने त्याच्याशी संवाद साधला आहे. मात्र, आपल्याला काय करायचे आहे, हे त्यानेच ठरवावे,’’ असे वक्तव्य मुंबईच्या मर्यादित षटकांचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुश्ताक अली स्पर्धेतील विजयानंतर केले होते.

रणजी संघातून वगळण्यात आल्यानंतर पृथ्वीने व्यायाम करतानाची चित्रफीत प्रसिद्ध केली होती. ‘एमसीए’तर्फे त्याला तंदुरुस्त होण्यासाठी विशेष साहाय्य केले जात होते. मात्र, आता त्याने पुन्हा तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे ‘एमसीए’ पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

क्रिकेटपटू म्हणून पृथ्वीमधील गुणवत्ता सर्वांना ठाऊक आहे. मात्र, तोच स्वत:चा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्याने अन्य कोणालाही दोष देऊ नये.

विजय हजारे स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने आपली नाराजी समाजमाध्यमावरून व्यक्त केली. परंतु याचा काही फायदा आहे का? अशा पोस्टमुळे निवड समिती किंवा ‘एमसीए’चा निर्णय बदलणार आहे का? – ‘एमसीए’ पदाधिकारी.

Story img Loader