भारताचा उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर BCCI कडून ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली. ही बंदी मागील तारखेपासून (बॅक डेटेड) असल्याने पृथ्वी शॉला काहीसा दिलासा मिळाला. पण तसे असले तरी ही शिक्षादेखील पृथ्वी शॉ सारख्या उदयोन्मुख खेळाडूसाठी जास्तीच आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला पृथ्वी शॉ याने खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध प्यायलं. यानंतर डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने पृथ्वीला BCCI ने आठ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. १९ वर्षाच्या पृथ्वीवर १५ नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुश्ताक अली करंडक स्पर्धेत खेळताना त्याची डोपिंग चाचणी करण्यात आली. त्यावेळी तो डोपिंग चाचणीत दोषी आढळला.

याबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले की पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याला निलंबनाची शिक्षा देण्यात आली आहे. पण त्याला देण्यात आलेली शिक्षा खूपच कठोर आहे. पृथ्वी हा एक उदयोन्मुख खेळाडू आहे. पण त्याचे वय आणि त्याची पार्श्वभूमी पाहून त्याला शिक्षेत थोडी सूट देता आली असती. पृथ्वी शॉ सामान्य पार्श्वभूमीतून आला आहे. नवोदित खेळाडूसाठी ही शिक्षा थोडी जास्तच कठोर आहे, असे ते म्हणाले.

BCCI कडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader