नॉर्दम्प्टन : भारताचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉने इंग्लंडमधील रॉयल लंडन चषक एकदिवसीय स्पर्धेत बुधवारी नॉर्दम्प्टनशायर संघाकडून खेळताना तडाखेबंद द्विशतक साकारले. मुंबईकर पृथ्वीने सोमरसेटविरुद्ध अवघ्या १५३ चेंडूंत २८ चौकार व ११ षटकारांची आतषबाजी करताना २४४ धावांची खेळी केली.
२३ वर्षीय पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळवणे अवघड जात आहे. त्याने २०२१ सालापासून भारतासाठी सामना खेळलेला नाही. आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठीही त्याचा विचार केला जाणार नसल्याने त्याने इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. रॉयल लंडन चषक स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत पृथ्वी अनुक्रमे ३४ व २६ धावाच करू शकला होता. त्यातच पहिल्या सामन्यात तो यष्टींवर पडला आणि ‘हिट विकेट’ झाला होता. मात्र, नॉर्दम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात त्याने द्विशतकी खेळी केली. सोमरसेटविरुद्ध त्याने पहिल्या १०० धावा ८१ चेंडूंत, तर पुढील १०० धावा केवळ ४८ चेंडूंत पूर्ण केल्या. तसेच २४४ धावांच्या खेळीसह त्याने रॉयल लंडन स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला. या स्पर्धेत द्विशतक करणारा तो पहिलाच भारतीय आहे. त्याच्या खेळीमुळे नॉर्दम्प्टनशायरने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ४१५ अशी मोठी धावसंख्या उभारली.