Prithvi Shaw falling on the stumps in county cricket video goes viral: भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी त्याने हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पृथ्वी शॉने कौंटीमध्ये नॉर्थहॅम्पशायरसाठी रॉयल लंडन वन-डे कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या स्पर्धेच्या पदार्पण सामन्यात त्याची कामगिरी काही खास राहिले नाही. त्याचबरोबर तो पहिल्याच सामन्यात एका विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नॉर्थहॅम्पशायरसाठी खेळताना पहिल्याच सामन्यात बाउन्सर बॉलसमोर पृथ्वी शॉला नतमस्तक व्हावे लागले. त्यामुळे पृथ्वी शॉसाठी त्याचे कौंटी पदार्पण काही खास ठरले नाही. ग्लॉस्टरशायरचा वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मीकर्नचा बाऊन्सर चेंडू धोकादायक वेगाने येत असल्याने शॉला आपला तोल सांभाळता आला नाही आणि तो स्टंपवर आपटला.
पॉल व्हॅन मीकरेनच्या या बाऊन्सर बॉलवर पृथ्वी शॉने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेगाने त्याच्या डोक्यावरून गेला आणि याचदरम्यान त्याचा तोल गेला आणि बॅट स्टंपवर आदळली. शॉने कौंटी पदार्पणात ३४ धावांची खेळी केली.
सराव सामन्यात पृथ्वीने झळकावले होते अर्धशतक –
कौंटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यापूर्वी पृथ्वी शॉला सराव सामना खेळण्याची संधीही मिळाली होती. या इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये शॉने स्टीलबॅकविरुद्ध आक्रमक अर्धशतक झळकावले होते. शॉच्या बॅटमधून ३९ चेंडूत ६५ धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली. २०२३ चा आयपीएल सीझन पृथ्वी शॉसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. तो अजूनही फॉर्ममध्ये परतलेला नाही. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघातही त्याची निवड झालेली नाही. शॉने २०२१ च्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता.