Prithvi Shaw’s Half Century in Duleep Trophy Final 2023: दुलीप ट्रॉफी २०२३ चा अंतिम सामना सध्या बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात सुरू असलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दक्षिण विभागाने आपली पकड मजबूत केली होती. दक्षिण विभागाच्या पहिल्या डावातील २१३ धावांच्या धावांच्या तुलनेत पश्चिम विभागाने १२९ धावांपर्यंत ७ गडी गमावले होते. मात्र, पश्चिम विभागाकडून सलामीवीर पृथ्वी शॉने कठीण परिस्थितीत अर्धशतक झळकावले.
पृथ्वी शॉ गेल्या दोवन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याचबरोबर या काळात त्याच्याकडून बॅटने कोणतीही खास कामगिरी झालेली नाही. अशा परिस्थितीत दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने झळकावलेले हे अर्धशतक आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढवू शकते.
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही पृथ्वी शॉला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला दोन्ही डावात २६ आणि २५ धावाच करता आल्या. मात्र, आता अंतिम फेरीत त्याने निश्चितच फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. शॉने ६५ धावांच्या खेळीत १०१ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकारही मारले. विजयकुमार वैशाखने त्याला बाद केले.
दक्षिण विभागाकडून विद्वत कवेरप्पाने दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी केली –
दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले ,तर दक्षिण विभागाचा संघ पहिल्या डावात २१३ धावांवर गारद झाला होता. यानंतर पश्चिम विभागीय संघाकडून पृथ्वी शॉची ६५ धावांची खेळी निश्चितच दिसून आली, परंतु इतर मोठ्या खेळाडूंनी त्यांच्या खेळाने निराशा केली. सरफराज खान खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी सूर्यकुमार यादव ८ आणि चेतेश्वर पुजारा केवळ ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाच्या संघाने १२९ धावापर्यंत ७ विकेट गमावल्या होत्या. विद्वत कवेरप्पाने ४ तर विजयकुमार वैशाकने दोन विकेट घेतल्या.