मुंबईचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात आपल्यावर लावण्यात आलेल्या बंदीची शिक्षा भोगून दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबईकडून विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पृथ्वीने आक्रमक फलंदाजी केली. यानंतर २०१९-२० हंगामातला आपला पहिला रणजी सामना खेळणाऱ्या पृथ्वीने बडोद्याविरुद्ध ६६ धावांची खेळी केली.
२०२० साली जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळेल. यातील कसोटी मालिकेसाठी पृथ्वी शॉचा पर्यायी सलामीवीराच्या जागेसाठी विचार केला जाऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळण्याआधी भारताचा अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या संघात पृथ्वी शॉची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ सोबतच अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल या फलंदाजांनाही अ संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांची माहिती होण्यासाठी निवड समिती हा निर्णय घेऊ शकते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताचा अ संघ न्यूझीलंडला रवाना होईल.