लखनऊ : शेष भारताचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (१९१ धावा) आणि यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल (९३) यांच्या झुंजार खेळींनंतरही इराणी चषक क्रिकेट लढतीत मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यश आले. मात्र, दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ (७६) वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने मुंबईने झटपट गडी गमावले. त्यामुळे अखेरचा दिवस शिल्लक असताना इराणी चषक लढत रंगतदार स्थितीत आहे. परंतु, आव्हानात्मक खेळपट्टीमुळे मुंबईचे पारडे जड मानले जात आहे.

शुक्रवारी, सामन्याच्या चौथ्या दिवशी ४ बाद २८९ धावांवरून पुढे खेळताना शेष भारताचा पहिला डाव ४१६ धावांत संपुष्टात आला आणि रणजी विजेत्या मुंबईला १२१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईची पडझड झाली. चौथ्या दिवसअखेर मुंबईची ६ बाद १५३ अशी स्थिती होती आणि त्यांच्याकडे एकूण २७४ धावांची आघाडी होती. सर्फराज खान (नाबाद ९) आणि तनुष कोटियन (नाबाद २०) खेळपट्टीवर असल्याने मुंबईचा संघ अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

हेही वाचा >>> IND W vs NZ W: “या टप्प्यावर येऊन अशा चुका…”, भारताच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

पहिल्या डावातील आघाडीनंतर मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉने दुसऱ्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्याने ३७ चेंडूंतच अर्धशतक साकारले. मात्र, दुसऱ्या बाजूने गडी बाद होत राहिले. मध्य प्रदेशचा ऑफ-स्पिनर सारांश जैनने पदार्पणवीर आयुष म्हात्रेला (१४) माघारी धाडत मुंबईला पहिला धक्का दिला. मग डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने हार्दिक तामोरे (७) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (९) यांना बाद करत मुंबईच्या अडचणी वाढवल्या. पाठोपाठ सारांश जैनने श्रेयस अय्यरचाही (८) अडसर दूर केला. सातत्याने गडी बाद होत राहिल्याने पृथ्वीच्या धावांचा वेगही मंदावला. अखेर १०५ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ७६ धावांची खेळी केल्यानंतर पृथ्वीला सारांश जैनने माघारी धाडले. याच षटकात त्याने शम्स मुलानीलाही (०) बाद केले. यानंतर सर्फराज आणि तनुष यांनी चिवट प्रतिकार केला.

त्यापूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला शेष भारतासाठी अभिमन्यू ईश्वरन आणि ध्रुव जुरेल यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १६४ धावांची भर घातली. परंतु ईश्वरनचे द्विशतक नऊ धावांनी, तर जुरेलचे शतक सात धावांनी हुकले. या दोघांनाही डावखुरा फिरकीपटू मुलानीने बाद केले. ईश्वरनने २९२ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकारासह १९१ धावांची, तर जुरेलने १२१ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावांची खेळी केली. मुलानी (३/१२२) आणि ऑफ-स्पिनर तनुष कोटियन (३/१०१) यांनी शेष भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळत मुंबईला मोठी आघाडी मिळवून दिली. शेष भारताने अखेरचे सहा गडी २३ धावांतच गमावले.

प्रतीक्षा संपणार?

मुंबईचा संघ १९९७-९८च्या हंगामानंतर प्रथमच इराणी चषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. २७ वर्षांची ही प्रतीक्षा संपविण्यासाठी मुंबईला हा सामना अनिर्णित राखणेही पुरेसे ठरणार आहे. सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजेते घोषित करण्यात येईल. दुसरीकडे, शेष भारताला विजय मिळवण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे आज, शनिवारी लढतीच्या पाचव्या दिवशी मुंबईचा डाव झटपट गुंडाळून आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा शेष भारताचा प्रयत्न असेल.