मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्येच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटीत पृथ्वीने अर्धशतकी खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाचा डाव सावरत आपली अर्धशतकी खेळी साजरी केली.
याचसोबत पृथ्वीने राजकोटच्या मैदानात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉने आपलं स्थान पक्क केलं आहे. पृथ्वीने ५६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, या कामगिरीसह त्याने लाला अमरनाथ यांनाही मागे टाकलं. अमरनाथ यांनी ५९ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
दरम्यान सामना सुरु होण्याआधी कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी भारतीय संघाची टोपी देऊन सत्कार केला. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा पृथ्वी २९३ वा खेळाडू ठरला आहे. याचसोबत केवळ १४ प्रथमश्रेमी सामन्यांच्या अनुभवानंतर भारतीय संघात पृथ्वीने पदार्पण केलं आहे. याआधी सचिन तेंडुलकरने केवळ ९ प्रथमश्रेणी सामन्यांनंतर भारतीय संघात पदार्पण केलं होतं.