Prithvi Shaw’s Leg Photo Post With Emotional Photo: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. कौंटी क्रिकेटमधील एकदिवसीय चषकादरम्यान तो जखमी झाला होता. आता पृथ्वी शॉने इन्स्टाग्राम स्टोरीवर दुखापतग्रस्त पायाचा फोटो शेअर करताना एक भावनिक संदेश लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही आयुष्यात शिखरावर असता, तेव्हा लोकं तुमच्या सोबत असतात. जेव्हा तुम्ही खाली असता, तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात.” कौंटी क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने कमालीची कामगिरी केली आहे. मात्र, दुखापतीमुळे तो मोजकेच सामने खेळला. यादरम्यान त्याने द्विशतकही झळकावले.

नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने दमदार कामगिरी करत सॉमरसेटविरुद्ध २४४ धावा केल्या होत्या. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला २ महिने लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यावरही साशंकता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई सध्या मुश्ताक अली ट्रॉफीचा चॅम्पियन आहे.

Prithvi Shaw's Emotional Post After Injury
पृथ्वी शॉची दुखापतीनंतर भावनिक पोस्ट (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफीपूर्वी फिट होण्याची शक्यता –

मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) आशा आहे की तो ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीपूर्वी तंदुरुस्त होईल. एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याच्याशी चर्चा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे दोन ते तीन महिने लागतील. तो डिसेंबरपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन जानेवारीमध्ये रणजी करंडक खेळू शकतो.”

हेही वाचा – World Cup 2023 ची ट्रॉफी ‘हा’ संघ उंचावेल! दीड महिन्यापूर्वीच सौरव गांगुलीने केली विजेत्याची घोषणा

पृथ्वी शॉने ४ सामन्यात केल्या होत्या ४२९ धावा –

२३ वर्षीय पृथ्वी शॉ हा ५० षटकांच्या स्पर्धेत इंग्लिश कौंटीचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याने चार डावांत शानदार ४२९ धावा केल्या, ज्यात सॉमरसेटविरुद्धच्या विक्रमी २४४ धावांचा समावेश आहे. इंग्लंडमधील लिस्ट ए क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय त्याने तीन डावात १२५, २६ आणि नाबाद ३४ धावा केल्या होत्या. दुखापत होण्यापूर्वी पृथ्वी शॉची कॅरेबियन दौरा, आयर्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही निवड झाली नाही.