दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयसचेही संघात पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो खेळला नव्हता. त्याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना टी२० विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी पृथ्वी शॉ हा मोठा दावेदार होता, मात्र निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता त्याच्या वेदना सोशल मीडियावर पसरल्या आहेत. संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने आपले मौन सोडले आहे. भारताचा स्टार फलंदाज दीर्घकाळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. दुलीप चषकामध्ये त्याने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र निवड समितीने पृथ्वी शॉला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग बनवलेले नाही.
भारतीय संघाकडून प्रथमच बोलावणे आलेल्या रजत पाटीदार आणि मुकेश कुमारसह १६ खेळाडूंच्या या संघात शाहबाज अहमद आणि राहुल त्रिपाठी या आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, या संपूर्ण यादीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ याचे नाव नाही. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
पृथ्वीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्याच्या कृतीवर विश्वास ठेवा. कृती हे सिद्ध करते की, शब्द अर्थहीन का आहेत..’ पृथ्वी शॉने येथे कोणाचेही नाव घेतले नसले तरी तो हताश आणि निराश झाल्याचे मानले जात आहे. टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. पृथ्वी शॉ भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतीय संघासाठी ५ कसोटी सामन्यात ३३९ धावा, ६ एकदिवसीय सामन्यात १८९ धावा आणि एक टी२० सामना खेळला आहे. खराब फॉर्ममुळे तो भारतीय संघाच्या बाहेर गेला होता, पण २०२२ मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. मात्र यावेळी निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.