नुकत्याच पार पडलेल्या राजकोट कसोटीत मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉने शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावल्यामुळे पृथ्वीचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. सोशल मीडियावरही अनेकांनी पृथ्वीचं अभिनंदन केलं. यात काही खासगी कंपन्यांनी पृथ्वीचं नाव वापरुन आपली जाहीरात करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये Swiggy आणि FreeCharge या कंपन्या आता चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत. पृथ्वी शॉचं मार्केटींग व अन्य कार्यक्रम सांभाळणारी कंपनी Basline Ventures ने Swiggy आणि FreeCharge या कंपन्यांना हे प्रकार थांबवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. याचसोबत दोन्ही कंपन्यांनी परवानगी न घेता पृथ्वीचं नाव वापरल्यामुळे प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांनी परवानगी न घेता पृथ्वीचं नाव स्वतःची जाहीरात करण्यासाठी वापरलं. पृथ्वीच्या कार्यक्रमांचं नियोजन व अन्य बाबी सांभाळण्याचे हक्क हे Basline Ventures कंपनीकडे आहेत. दोन्ही कंपन्यांनी केलेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून, पृथ्वीने केलेल्या कामगिरीचा हा वापर केल्यासारखं आहे. याचसोबत भविष्यात पृथ्वीला अन्य कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळालं तर त्यावेळी असे प्रकार त्याच्यासाठी मारक ठरु शकतात. यासाठी आम्ही दोन्ही कंपन्ययांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं Basline Ventures चे महाव्यवस्थापक तुहीन मिश्रा यांनी इकॉनॉमिक टाइम्स शी बोलताना सांगितलं.

या प्रकरणात Swiggy कंपनीच्या प्रवक्त्यांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्याला नोटीस प्राप्त झाली असल्याचं मान्य केलं आहे. यावर काय पावलं उचलावीत यासाठी कंपनी कायदेशीर सल्ला घेत असल्याचं Swiggy च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. पृथ्वी शॉ आणि Basline Ventures या कंपनीमध्ये 2017 साली करार झाला होता. या करारानुसार पृथ्वी शॉचे देशातील व परदेशातील सर्व कार्यक्रम सांभाळण्याचे हक्क Basline Ventures कंपनीकडे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvi shaws team seeking 1 crore compensation from swiggy freecharge for tweets
Show comments