Priyanka Goswami Reel : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये चालणाच्या स्पर्धेत सहभागी झालेली भारतीय खेळाडू प्रियांका गोस्वामीला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी झालेल्या महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामीचा ४१ वा क्रमांक आला होता. त्यानंतर तिला ट्रोल केले गेले. त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारताकडून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी पोर्टेबल एसी पाठविण्यात आले होते. उकाड्यापासून खेळाडूंचे रक्षण करण्यासाठी एसी पाठविले गेले होते. त्यावर प्रियांका गोस्वामीने रिल तयार केले होते.
ऑलिम्पिकच्या चालण्याच्या शर्यतीमध्ये (रेस वॉक) प्रियांका गोस्वामी ४५ खेळाडूंमधून ४१ वी आली. प्रियांकाच्या या कामगिरीवरही जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर प्रियांका गोस्वामीने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तयार केलेले रिल इन्स्टाग्रामवरून डिलीट केले.
मुळची उत्तर प्रदेशची असलेल्या प्रियांकाने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पंखा जाऊन त्याजागी एसी आल्याचे रिल तयार केले होते. एसी लागल्यामुळे आपल्याला शांतपणे झोप लागत असल्याचे प्रियांकाने या रिलमधून दाखविले होते. या व्हिडीओनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. खेळाडूंनी स्पर्धेत जाऊन रील तयार करण्यापेक्षा आपली कामगिरी उंचावली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वीणा जैन नावाच्या एका एक्स युजरने म्हटले की, “प्रियांकाने रील बनविण्यापेक्षा खेळावर अधिक लक्ष दिले पाहिजे. कारण तुम्हाला करदात्यांच्या पैशांतून प्रशिक्षित केले जाते.” प्रियांका गोस्वामीला स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण दिले जाते, याकडेही वीणा जैन यांनी लक्ष वेधले.
वीणा जैन यांनी प्रियांका गोस्वामीवर टीका करणारी पोस्ट टाकल्यानंतर या पोस्टला लोकांनी उचलून धरले आहे. आतापर्यंत या पोस्टला १.८ दशलक्ष व्ह्यूज मिळाल्या आहेत. वीणा जैन यांच्याशी अनेक जणांनी सहमती दर्शविली असली तरी अनेकजण प्रियांका गोस्वामीच्या समर्थनार्थही बोलत आहेत. काही जणांनी म्हटले की, ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यामुळे प्रियांका गोस्वामी ही विजेती ठरलेलीच आहे. या क्रीडा प्रकारासाठी ती एकमेव भारतीय आहे, जिची निवड झाली.
हे ही वाचा >> Paris Olympic 2024 Live, Day 11: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, सलग दोन सामन्यात दणदणीत विजय
तर इतर काही युजरने म्हटले की, प्रियांका क्रीडापटूऐवजी इन्फ्ल्युएन्सर वाटत आहे. ती तिथे खेळण्यासाठी नाही तर सुट्ट्यांवर गेलेली दिसते.
पण काही जणांनी प्रियांका गोस्वामीची पाठराखणही केली आहे. राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये प्रियांका गोस्वामीने रौप्यपदक जिंकले होते. एका एक्स युजरने म्हटले की, जगातील ७९५ कोटी लोकांमधून ती ४१ वी आली आहे. त्यामुळेच ती ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकली.
काही जणांनी तिच्या स्वित्झर्लंडमधील प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये असे काय आहे? हे प्रशिक्षण इतर ठिकाणी दिले जात नाही का? असाही प्रश्न विचारला गेला. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या बातमीनुसार, धावपटू हे अनेकदा उंचावरील ठिकाणी प्रशिक्षण घेत असतात. कारण तेथील वातावरणात तयारी केल्यामुळे शरीर आणखी मेहनत करण्यासाठी तयार होते. त्यामुळे अनेक प्रख्यात धावपटू, क्रीडापटू स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण घेतात.