Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over in DPL 2024 : दिल्ली प्रीमियर लीग २०२४ चा २३ वा सामना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला, जो टी-२० क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. या सामन्यात २३ वर्षीय सलामीवीर प्रियांश आर्यने एक मोठा पराक्रम केला. प्रियांश आर्यने एकाच षटकात ६ षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियांश आर्यचे एका षटकात सलग ६ षटकार –
या लीगमध्ये प्रियांश आर्याची बॅट चांगली तळपताना दिसत आहे. या लीगमध्ये त्याने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, उत्तर दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने मनन भारद्वाजविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. सामन्याच्या १२व्या षटकात प्रियांशने प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवला. यासह, तो एका षटकात सलग ६ षटकार मारणारा दिल्ली प्रीमियर लीगचा पहिलाच फलंदाज बनला आहे. याआधी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.
प्रियांश आर्यने झळकावले दुसरे शतक –
प्रियांश आर्यने या सामन्यात ५० चेंडूंचा सामना करत १२० धावांची धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीत प्रियांश आर्यने १० चौकार आणि १० षटकार मारले. प्रियांश आर्यने २४० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. आयुष बडोनीसह त्याने दुसऱ्या विकेटसाठी २८६ धावांची भागीदारी केली, जी या लीगमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. प्रियांशची ही पहिलीच खेळी नाही, त्याने एकामागून एक अशा अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत.
हेही वाचा – Azam Khan CPL 2024 : वेगवान बाऊन्सर गळ्यावर बसला आणि आझम खान कोसळला; काय झालं पुढे? पाहा VIDEO
डीपीएलचे पहिले शतकही प्रियांशच्या नावे –
प्रियांशने लीगच्या १५ व्या सामन्यात जुनी दिल्ली संघाविरुद्धही शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने ५५ चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी केली होती. प्रियांश आर्यने १९४.५५ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. यानंतर मध्य दिल्लीविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या ४२ चेंडूत ८८ धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ६ षटकार आणि ७ चौकार पाहायला मिळाले.