घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सला नमवत प्रो कबड्डी लीगमध्ये गुणांचे खाते उघडले तर दुसऱ्या लढतीत गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाने यू मुंबावर मात केली.
जयपूर आणि तेलुगू दोन्ही संघांनी सलामीची लढत गमावली होती. त्यामुळे बोहनी करण्यासाठी दोन्ही संघ आतूर होते. जयपूरच्या संघाने दिमाखदार अष्टपैलू प्रदर्शनाच्या बळावर २८-२४ सरशी साधली. या विजयासह जयपूरने सहा गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. १२-१२ अशा बरोबरीनंतर जयपूरने १६-१५ अशी निसटती आघाडी घेतली. राजेश नरवालच्या यशस्वी चढाईच्या जोरावर जयपूरने २४-१७ अशी आगेकूच केली. शेवटच्या क्षणांमध्ये जसवीर सिंगच्या आक्रमक चढाईच्या जोरावर जयपूरने विजय साकारला.
अटीतटीच्या लढतीत पाटणा पायरेट्सने यू मुंबावर ३६-३४ अशी मात केली. आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही आघाडय़ांवर दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. प्रदीप नरवालने १८ गुणांच्या कमाईसह पाटण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. घरच्या मैदानावर लौकिकाला साजेसा खेळ करू न शकणाऱ्या रिशांक देवाडिगाने ११ गुण मिळवत सूर गवसल्याचे संकेत दिले.
पुणेरी पलटणला मुंबईतही चांगला पाठिंबा
व्यवस्थापक कैलास कंडपाल यांचा दावा
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई</p>
प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या सत्रातील पहिली टप्पा पुण्याऐवजी अचानक मुंबईत हलवल्यामुळे पुणेरी पलटणच्या चाहत्यांचा निराशाभंग झाला. मात्र चाहत्यांची हिरमोड होऊ नये, याकरिता पलटणने विशेष बसचे आयोजन करून सर्वाची मने जिंकली. ‘‘सामन्याचे स्थळ अचानक स्थलांतरित केल्यामुळे थोडेसा गोंधळ उडाला. मात्र, मुंबईत मिळालेला प्रतिसाद पाहून थक्क झालो. यू मुंबाच्या व्यवस्थापक चमूनेही बरीच मदत केली,’’ अशी प्रतिक्रिया पुणेरी पलटण संघाचे व्यवस्थापक कैलास कंडपाल यांनी दिली.
मुंबईत झालेल्या पहिल्या टप्प्यात पलटनने चारपैकी दोन सामन्यांत विजय मिळवले. पाटना पायरेट्सने त्यांना पराभूत केले, तर दबंग दिल्लीविरुद्ध त्यांचा बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या टप्प्यातील कामगिरीवर कंडपाल यांनी समाधान व्यक्त केले.