रिशांक देवाडीगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यूपी योद्धा संघाला प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सहाव्या पर्वात युवा बचावपटू विशाल भारद्वाजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तेलगू टायटन्सने यूपी योद्धाजची झुंज 34-29 अशी मोडून काढली. तेलगू टायटन्सच्या चढाईपटूंनी केलेला आक्रमक खेळ व त्यांना बचावपटूंनी दिलेली भक्कम साथ या जोरावर तेलगूने सामन्यात बाजी मारली.
बचावफळीची निराशा आणि प्रशांत कुमार रायव्यतिरीक्त अन्य कोणत्याही खेळाडूचं न चालणं ही उत्तर प्रदेशच्या पराभवाची प्रमुख कारणं ठरली. प्रशांतने सामन्याच्या अखेरच्या मिनीटापर्यंत झुंज कायम ठेवत 11 गुणांची कमाई केली. कर्णधार रिशांक देवाडीगानेही चढाईत 7 गुण कमावले, मात्र दुसऱ्या सत्रात त्याच्या कामगमिरीत सातत्य नव्हतं. त्यामुळे उत्तर प्रदेशचा संघ संधी असूनही सामन्यात पुनरागमन करु शकला नाही.
दुसरीकडे तेलगू टायटन्सच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ केला. चढाईत राहूल चौधरी आणि निलेश साळुंखे यांनी मिळून 16 गुण कमावले. त्यांना बचावफळीत अबुझार मिघानी, विशाल भारद्वाज, अष्टपैलू फरहाद यांनी उत्तम साथ दिली. या आक्रमक खेळीच्या जोरावर तेलगू टायटन्सने सामन्यात विजय संपादन केला.