प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेश योद्धाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तामिळ थलायवाज संघाला ३७-३२ ने मात देत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तामिळ थलायवाजने गतविजेत्या पाटणा पायरेट्सला पराभवाची धूळ चारली, मात्र उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध त्यांची झुंज अखेर तोकडीच पडली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : एकतर्फी सामन्यात पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात
बचावफळीची निराशाजनक कामगिरी हे तामिळ थलायवाजच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. मोक्याच्या क्षणी तामिळ थलायवाजचे बचावपटू सामन्याच गुणांची कमाई करु शकले नाहीत. अखेरच्या क्षणांमध्ये अनुभवी मनजीत छिल्लरने काही चांगल्या पकडी करुन सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तोपर्यंत उत्तर प्रदेशने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. बचावफळीत अमित हुडा, दर्शन, सी. अरुण यांचं अपयश तामिळ थलायवाजला चांगलचं भोवलं. कर्णधार अजय ठाकूरने सलग दुसऱ्या सामन्यात १० पेक्षा जास्त गुणांची कमाई केली, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.
दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या संघातील खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. चढाईत प्रशांत कुमार रायने ८ गुणांची कमाई केली. त्याला महाराष्ट्राच्या श्रीकांत जाधव आणि रिशांक देवाडीगाने प्रत्येकी ४-४ गुण घेत चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या मिनीटांमध्ये तामिळ थलायवाजने काही गुणांची कमाई करत उत्तर प्रदेशच्या गोटात खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला, मात्र रिशांक आणि कंपनीने वेळेत स्वतःला सावरत सामन्यात बाजी मारली.