उपांत्य फेरीत यू मुंबाची वाटचाल रोखण्यास बंगाल उत्सुक

अहमदाबाद : सलग दुसऱ्या प्रो कबड्डी लीग विजेतेपदाच्या ईष्र्येने मार्गक्रमण करणाऱ्या बेंगळूरु बुल्सला रोखण्याचे आव्हान बुधवारी पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढय़ दबंग दिल्लीपुढे असेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सलग पाच सामने अपराजित राहणाऱ्या यू मुंबाची वाटचाल खंडित करण्यासाठी बंगाल वॉरियर्स उत्सुक आहे.

ट्रान्सस्टॅडिया येथे होणाऱ्या दोन्ही सामन्यांद्वारे शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठीचे दोन स्पर्धक निश्चित होणार आहेत. यंदाच्या हंगामातील २२ सामन्यांपैकी सर्वाधिक १५ विजय मिळवून गुणतालिकेत अग्रस्थानावर राहणाऱ्या दिल्लीला गतविजेत्या बेंगळूरुला हरवणे सोपे नसेल. कारण पवन शेरावतकडे कोणत्याही कठीण परिस्थितीतून सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. सोमवारी एलिमिनेटर सामन्यात याचा प्रत्यय यूपी योद्धाला आहे. परंतु यंदाच्या हंगामात दिल्लीला हरवणे बेंगळूरुला जमलेले नाही. उभय संघांमधील पहिला सामना दिल्लीने ३३-३१ असा दोन गुणांनी जिंकला, तर दुरा सामना ३९-३९ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. बेंगळूरुचा चढाईपटू सुमित सिंग आणि बचावपटू महेंदर सिंग संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. दिल्लीच्या आक्रमणाची भिस्त युवा नवीन कुमारवर आणि बचावाची जबाबदारी रवींदर पहेलवर असेल.

यंदाच्या हंगामात बंगाल वॉरियर्सने २२ सामन्यांपैकी १४ विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. यापैकी यू मुंबाविरुद्धचे दोन विजय (३२-३०, २९-२६) बंगालसाठी आत्मविश्वास उंचावणारे आहेत. यंदाच्या हंगामात दोनशे गुणांचा टप्पा पार करणाऱ्या मणिंदर सिंगवर बंगालच्या आक्रमणाची आणि बलदेव सिंगवर बचावाची जबाबदारी असेल. यू मुंबाची यंदाच्या हंगामात सुरुवात धिम्या गतीने झाली. परंतु नंतर त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. सोमवारी बाद फेरीत यू मुंबाने राकेश कुमारच्या मार्गदर्शनाखालील हरयाणा स्टीलर्सचा ४६-३८ असा पाडाव केला. यू मुंबाकडे अभिषेक सिंग, अर्जुन देशवाल यांच्यासारखे गुणी चढाईपटू तसेच फझल अत्राचाली, संदीप नरवाल यांच्यासारखे भक्कम बचावपटू आहेत.

यूपी योद्धाविरुद्धचा बाद फेरीचा सामना अतिशय रंगतदार झाला. माझ्या आयुष्यातील तो सर्वात रोमहर्षक सामना तो होता. या सामन्यात सुरुवातीला आम्ही पिछाडीवर होतो. परंतु प्रशिक्षकांनी आमचा आत्मविश्वास उंचावल्याने सामन्याचा निकाल पालटू शकलो. यंदाच्या हंगामात दिल्लीविरुद्धसुद्धा आमचे साखळी सामने रंगतदार झाले आहेत. त्यांच्याकडे आक्रमण आणि बचावाचा सुरेख समन्वय आहे. त्यामुळे उपांत्य सामना रंगतदार होईल.

-पवन शेरावत, बेंगळूरु बुल्सचा कर्णधार

 

आजचे उपांत्य सामने

* बेंगळूरु बुल्स वि. दबंग दिल्ली

* यू मुंबा वि. बंगाल वॉरियर्स

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

Story img Loader