प्रो कबड्डी लीगनंतर हिमाचल प्रदेशच्या तिआरा गावात राहणाऱ्या रोहित राणाचे आयुष्य पालटले. जयपूर पिंक पँथर्सच्या या हरहुन्नरी डाव्या मध्यरक्षकाने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात आपल्या लक्षवेधी कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या विजेतेपदात राणाच्या पोलादी क्षेत्ररक्षणाचा मोलाचा वाटा होता. २६ वर्षीय रोहित गेली काही वष्रे एअर इंडिया, ओएनजीसी आदी कंपन्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात खेळाडू म्हणून नोकरी करीत होता; परंतु प्रो कबड्डीमधील यशस्वी कामगिरीनंतर भारत पेट्रोलियमने त्याला कायमस्वरूपी नोकरी दिली. त्यामुळेच या स्पध्रेचे माझ्यावर खूप उपकार आहेत, असे तो अभिमानाने सांगतो.
‘‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझे वडील सेनादलात अधिकारी होते. त्यामुळे घरातून खेळाला योग्य प्रोत्साहन मिळत होते; परंतु बराच काळ नोकरी मिळत नसल्याने घरातून मात्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रो कबड्डीनंतर भारत पेट्रोलियममध्ये चांगली नोकरी लागली आणि माझ्या जीवनाला स्थर्य मिळाले,’’ असे रोहितने सांगितले.
प्रो कबड्डीनंतर गावात झालेल्या स्वागताविषयी रोहित म्हणाला, ‘‘गतवर्षी प्रो कबड्डी खेळून मी आणि अजय ठाकूर जेव्हा हिमाचलमधील आमच्या गावी गेलो, तेव्हा आमचे जल्लोषात स्वागत झाले. निवडणुकीनंतर एखाद्या नेत्याची जशी मिरवणूक काढली जाते, तशाच प्रकारे आमच्या मिरवणुकीसाठी लोक मोठय़ा प्रमाणात जमले होते. रस्त्यावर दुतर्फा गर्दी होती. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
हिमाचल प्रदेशमध्ये प्रो कबड्डीनंतर कसे वातावरण बदलले, हे मांडताना रोहित म्हणाला, ‘‘हिमाचलमध्ये कबड्डी या खेळाविषयी फारशी उत्सुकता नव्हती. मात्र प्रो कबड्डीनंतर या खेळाची लोकप्रियता जनमानसात रुजली आहे. आता फुटबॉल, क्रिकेटप्रमाणे मुले कबड्डीसुद्धा खेळू लागले आहेत. माझ्या गावातसुद्धा कबड्डीची चांगली वातावरणनिर्मिती झाली आहे. मलासुद्धा लोक ओळखू लागले आहेत.’’
कबड्डीची आवड कशी निर्माण झाली, याबाबत रोहित म्हणाला, ‘‘मी शाळेत असतानाच कबड्डी खेळायला लागलो. या खेळाची आवड माझ्यात निर्माण झाली. त्यानंतर सात वष्रे हॉस्टेलमध्ये राहून कबड्डी गांभीर्याने खेळू लागलो. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय दर्जाचा प्रवास करताना गेली १३ वष्रे बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. एअर इंडियाने मला व्यावसायिक स्तरावर पहिल्यांदा संधी दिली. तिथे अनेक दिग्गज ख्ेाळाडूंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या खेळाला पैलू पाडले गेले.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘राष्ट्रीय दर्जाची कबड्डी खेळताना सुरुवातीच्या काळात खूप कठीण जायचे, कारण हिमाचल प्रदेशचा संघ कच्चा मानला जायचा; परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मी, अजय यांच्याप्रमाणे आमच्या राज्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही आता अन्य राज्यांना चांगली लढत देऊ लागलो आहोत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा