चढाईपटूची ३० सेकंदांची चढाई संपेल ते स्क्रीनवरील उलटगणती करणाऱ्या घडय़ाळाद्वारे सर्वानाच कळेल. पण मैदानावर कार्यरत पंचांना आणि खेळाडूलासुद्धा त्याचा इशारा मिळावा, यासाठी चढाई संपली, हे दर्शवणाऱ्या बझरचा समावेश ‘प्रो-कबड्डी’मध्ये करण्यात आला आहे. सुरुवातीला फक्त स्क्रीनवरच चढाईच्या वेळेचा अंदाज येत होता. त्यामुळे काही पंचांनी याबाबतच्या अडचणी सांगितल्या. त्यामुळे बझरचा समावेश करण्यात आल्याचे भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख ई. प्रसाद राव यांनी सांगितले.
‘प्रो-कबड्डी’ सुरू व्हायला काही तासांचा अवधी असताना अनेक आव्हाने आणि अडचणींवर मात करण्यासाठी संयोजक मेहनत घेत होते. एखाद्या सामन्यात अनेक झटापटी झाल्या आणि त्याचे रिप्ले दाखवत बसल्यास वेळेचे गणित सांभाळण्यासाठी प्रक्षेपणकर्त्यां स्टार स्पोर्ट्स वाहिनीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याचप्रमाणे सामना बरोबरी सुटल्यास अतिरिक्त वेळ आणि सुवर्णचढाईचे नियम प्रो-कबड्डीमध्येसुद्धा कायम ठेवण्यात आले आहेत. अतिरिक्त वेळेत तीन मिनिटांची दोन सत्रे असतील आणि एका मिनिटाच्या विश्रांतीचा समावेश असेल, असे राव यांनी पुढे सांगितले.
‘‘खेळात अधिक चुरस निर्माण व्हावी, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या प्रो-कबड्डीमधील नव्या नियमांना आता खेळाडू सरावले आहेत. त्यांची योग्यता पटल्यास कबड्डीच्या बाकी स्पर्धासाठीसुद्धा त्याचा विचार करण्यात येईल,’’ असे ते पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा