‘‘प्रो कबड्डी लीगमध्ये विविध देशांचे खेळाडू खेळत आहेत. ते कालांतराने या खेळात तरबेज होतील आणि भारताला कडवे आव्हान देतील, अशा पद्धतीने मी अजिबात विचार करीत नाही. हा खेळ आम्हाला भारतापुरता मर्यादित ठेवायचा नाही, तर त्याचे जागतिकीकरण करायचे आहे,’’ असे मत भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी व्यक्त केले.
‘‘प्रो कबड्डीत भारतीय खेळाडूच मोठय़ा प्रमाणात खेळत आहेत. त्यामुळे देशातील कबड्डीची गुणवत्ता ही मोठय़ा प्रमाणात विकसित होत आहे, याकडे दुर्लक्षा करून चालणार नाही. अनेक युरोपियन तसेच आफ्रिकन देशांकडून कबड्डीबाबत आता विचारणा होऊ लागली आहे. अशा वेळी संकुचित मनोवृत्ती बाळगणे अयोग्य आहे. आपण गेली अनेक वष्रे आशियाई क्रीडा स्पध्रेचे सुवर्णपदक खात्रीने टिकवून आहे. याचप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये जेव्हा कबड्डीचा प्रवेश होईल, तेव्हासुद्धा आपणच सुवर्णपदकाला गवसणी घालू,’’ असे राव यांनी सांगितले.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाला सामोरे जाताना कोणते आव्हान समोर होते, याबाबत राव म्हणाले, ‘‘कबड्डी हा सर्वसामान्यांचा खेळ आहे, ज्याच्यासाठी कोणताही खर्च होत नाही, अशी सर्वाची धारणा होती. प्रो कबड्डी लीग रुजवण्यासाठी पहिला हंगाम आमच्यासाठी अधिक आव्हानात्मक होता. हा खेळ इतका लोकप्रिय आणि आकर्षक होईल असे आम्हाला वाटले नव्हते, परंतु आम्ही सर्वाची मानसिकता बदलण्यात यशस्वी झालो. त्यामुळे दुसऱ्या हंगामात आमच्यापुढे फारसे आव्हान नव्हते.’’
‘‘आता सर्वसामन्यच नव्हे, तर डॉक्टर, इंजिनीअर, आदी सुशिक्षित मंडळींनासुद्धा या खेळाचा लळा लागला आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये खेळाचा प्रभाव दिसून येत आहे,’’ असे राव यांनी सांगितले. हैदराबादच्या गचीबोली इनडोअर स्टेडियमवरील सामन्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाने भारावून गेलेले राव पुढे म्हणाले, ‘‘हैदराबादच्या मुख्य शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणीसुद्धा प्रेक्षक मोठय़ा संख्येने गर्दी करीत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या स्थित असलेल्या भागातील या स्टेडियमवर प्रथमच क्रीडारसिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.’’
यंदाच्या हंगामात गुणफलक मागील हंगामाप्रमाणे वेगाने धावत नसल्याबाबत स्पष्टीकरण देताना राव म्हणाले की, ‘‘पहिल्या हंगामात सर्वच खेळाडूंना नियम, सांघिकता, आदी गोष्टींचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे फक्त जिंकण्याचे एकच उद्दिष्ट बाळगून संघ खेळत होते. परंतु दुसऱ्या हंगामात आठही संघ व्यवस्थित बुद्धिबळाप्रमाणे रणनीती आखून उतरले आहेत. त्यामुळे तिसरी निर्णायक चढाई कोण करणार, कोणत्या वेळी कोणती व्यूहरचना करायची, आदी योजना सामन्यात दिसून येत आहेत. त्यामुळे गुणसंख्या उंचावली जात नाही.’’
बदललेल्या नियमांमुळे कोणता परिणाम झाला, हे मांडताना राव म्हणाले, ‘‘प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात वापरलेल्या नव्या नियमांमुळे खेळाचा कायपालट केला आहे. क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ मानला जातो. तसा कबड्डी हा चढाईपटूंचा खेळ मानला जायचा. अर्जुन पुरस्कार जिंकणारे अनेक कबड्डीपटू हे चढाईपटू आहेत. परंतु आम्ही केलेल्या नियमांमुळे आता हा खेळ समतोल झाला आहे. बचावपटूंनाही तितकेच महत्त्व दिले जाऊ लागले आहे.’’ ‘‘गतवर्षी इन्चॉन (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेप्रसंगी आशियाई कबड्डी महासंघाचे बैठक झाली. त्या बैठकीत ३० सेकंदांची चढाई, सुपर कॅच आणि सुविधा उपलब्ध असल्यास रेफरल (पंच पुनर्आढावा) हे तीन नियम आंतरराष्ट्रीय स्तरावर अंमलात आणण्याचा निर्णय घेतला,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा