ओंकार जाधव आणि विनोद अत्याळकर हे दोन मध्यमवर्गीय कबड्डीपटू. गेल्या वर्षी रंगलेला प्रो-कबड्डी लीगचा पहिला हंगाम या दोघांनीही टेलिव्हिजनच्या माध्यमातून अनुभवला. आपल्यालाही या स्पर्धेत खेळायला मिळावे असे या दोघांचे स्वप्न. नैसर्गिक गुणवत्तेला संघटनात्मक प्रयत्नांची साथ लाभल्याने या दोघांचेही प्रो-कबड्डीत खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. पहिल्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या यू-मुंबा संघाने ‘फ्युचर स्टार्स प्रतिभाशोध’ उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातूनच या जोडगोळीला कबड्डीला नवा आयाम देणाऱ्या प्रो-कबड्डी स्पर्धेत खेळायला मिळणार आहे.
ओंकारला कबड्डीचा वारसा घरातूनच मिळालेला. छत्रपती पुरस्कारविजेते विलास जाधव आणि कबड्डीपटू प्रीती जाधव या दांपत्याचा ओंकार हा मुलगा. दहावीपर्यंत क्रिकेट खेळणाऱ्या ओंकारने महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाल्यावर कबड्डी खेळायला सुरुवात केली. मात्र ओंकार राहत असलेल्या नालासोपाऱ्यात कबड्डीचा क्लबच नव्हता. साहजिकच खेळण्यासाठी त्याला रेल्वेचा प्रवास करून लोअर परळ गाठावे लागत असे. सकाळी महाविद्यालयात सराव, दुपारी तासिका आणि संध्याकाळी सरावासाठी लोअर परळच्या एचजीएस मंडळाचे पटांगण असा त्याचा भरगच्च दिनक्रम असे. मात्र खेळायला आवडत असल्याने या श्रमांचे ओझे जाणवले नाही असे ओंकारने सांगितले. ओंकार आणि त्याचे ४७ वर्षीय वडील दोघेही महिंद्रा क्लबतर्फे खेळतात. ‘‘चांगला खेळतोस. बाबांचा वारसा पुढे चालव असा सल्ला कबड्डीतील जाणकारांनी दिल्यामुळे खेळत राहिलो. यू-मुंबाच्या प्रतिभाशोध उपक्रमाअंतर्गत मिळालेली संधी स्वप्नवत आहे. तंदुरुस्ती आणि खडतर स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा भाग व्हायला मिळाले. तो अनुभव खूप
काही शिकवणारा होता,’’ असे ओंकारने सांगितले.
विनोद अत्याळकर हा बंडय़ा मारुती संघाचा खेळाडू. मध्य रेल्वेच्या सेवेत असणारा विनोद लहानपणापासून कबड्डी खेळत आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामात मध्य रेल्वेचा एकही खेळाडू नव्हता. यंदा ही उणीव भरून निघणार असल्याने आनंद वाटत असल्याचे विनोदने सांगितले. ‘‘अनेक वर्षे मातीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धामध्ये खेळलो. मॅटवरच्या स्पर्धेमुळे दुखापतींची भीती कमी झाली आहे. झोकून देऊन खेळू शकतो. यू-मुंबाच्या उपक्रमामुळे अव्वल दर्जासाठी कशा प्रकाराचा सराव करावा लागतो याची जाणीव झाली,’’ असे विनोद म्हणाला.
‘‘क्लब, मंडळांतर्फे होणाऱ्या स्पर्धाची बक्षीस रक्कम मर्यादित असते. प्रो-कबड्डी स्पर्धेमुळे सामान्य मध्यमवर्गीय खेळाडूंना आर्थिक सुबत्तेचा मार्ग खुला झाला आहे. तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर चांगली कामगिरी केल्यानेच मध्य रेल्वेतर्फे खेळाडू प्रवर्गात निवड झाली. गेल्या वर्षी प्रो-कबड्डी हंगाम सुरू असताना नातेवाईक, मित्रपरिवाराला मीही या स्पर्धेत खेळावे असे वाटत होते. यंदा सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे,’’ असे विनोदने सांगितले.
प्रत्येक लढत आव्हानात्मक
‘‘गेल्या हंगामात शब्बीर बापू हा प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने आमचे आव्हान कमकुवत झाले. अनुप कुमारला दुसऱ्या बाजूने साथच मिळू शकली नाही, तरीही आम्ही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. यंदा सगळे खेळाडू तंदुरुस्त आहेत. पहिल्या हंगामाची नवलाई आता नाही. सगळ्या संघाच्या खेळाडूंना प्रो-कबड्डीच्या स्वरूपाची माहिती झाली आहे. गेल्या वर्षी काही सामने झाल्यानंतर वेळेसंदर्भातील एक नियम बदलण्यात आला. यंदा सुरुवातीपासून हा नियम अवलंबण्यात येणार असल्याने प्रत्येक लढत चुरशीची होईल,’’ असे यू-मुंबाचे प्रशिक्षक भास्करन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा