३२ गुणांसह तिसरे स्थान ; तेलुगू टायटन्सचा बंगळुरूवर ४०-२२ असा सहज विजय
चढाईबरोबरच पकडीदेखील एक धारदार अस्त्र ठरू शकतात, हे पुणेरी पलटणने जयपूर पिंक पँथर्सला पराभूत करून दाखवून दिले. जयपूरवर ३३-१८ असा सोपा विजय मिळवत पुण्याने ३२ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. अन्य एका सामन्यात तेलुगू टायटन्सने बंगळुरू बुल्सवर ४०-२२ असा सहज विजय मिळवला.
पुण्याकडून उजवा मध्यरक्षक सुरजीतने पकडींमध्ये आठ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर कर्णधार मनजीत चिल्लरने सहा गुणांची कमाई केली. पुण्याने १७ व्या आणि ३१ व्या मिनिटाला सहजपणे जयपूरवर दोन लोण चढवले आणि सहजपणे विजय मिळवला. १७ व्या मिनिटाला पुण्याने पहिला लोण चढवत १४-७ अशी आघाडी घेतली. तेलुगू संघाकडून सुकेश हेगडेने चढाईत आठ गुणांची कमाई केली, तर राहुल कुमार, मनोज कुमार आणि मेराज शेख यांनी चांगल्या पकडी केल्या.
आजचा सामना
जयपूर पिंक पँथर्स वि. बंगाल वॉरियर्स
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३ वाहिन्यांवर.