प्रो-कबड्डीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण संघाने दबंग दिल्लीवर २६-२१ अशी मात केली. नागपूर येथे झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणच्या संघाला प्रेक्षकांचा जास्त पाठींबा मिळताना दिसत होता. मात्र दबंग दिल्लीच्या खेळाडूंनीही आपल्या खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली. रेडींग आणि डिफेन्समध्ये पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत या स्पर्धेतल आपला दुसरा विजय निश्चीत केला. तर पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर दबंग दिल्लीला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये दबंग दिल्लीने ६ पेक्षा कमी गुणांनी पराभव स्विकारल्यामुळे त्यांच्या खात्यात १ गुण जमा झाला आहे.
राजेश मोंडलचा झंजावात, कर्णधार हुडाचीही उत्तम साथ –
पुणेरी पलटण संघासाठी आजच्या सामन्यात हिरो ठरला तो राजेश मोंडल. आजच्या सामन्यात त्याने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळून रेडींगमध्ये ८ पॉईंट मिळवले. सलामीच्या सामन्यात यू मुम्बाविरुद्ध राजेशला अवघ्या २ पॉईंटवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र त्या सामन्याची कसर भरुन काढत राजेश मोंडलने पुण्याला या सामन्यात आघाडीवर नेण्यात मदत केली.
राजेश मोंडलला पॉईंट मिळवून देण्यात दिल्लीच्या बचावपटूंचा मोठा वाटा होता. विशेषकरुन दबंग दिल्लीचा पहिल्या सत्रातला बचाव हा खूप ढिसाळ होता. बाजीराव होडगे, निलेश शिंदे यांनी वॉकलाईनवर राजेश मोंडलला टॅकल करण्याची चूक केली, ज्याचा फायदा राजेश मोंडलला झाला.
धर्मराज आणि संदीप नरवालची रेडर्सना उत्तम साथ –
पुणेरी पलटणला बचावात धर्मराज चेरलाथन आणि संदीप नरवाल यांनी डिफेन्समध्ये उत्तम साथ दिली. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला डिफेन्समध्ये काही उत्तम पॉईंट मिळवत संदीप नरवालने दिल्लीच्या खेळाडूंवर दबाव टाकला. धर्मराज चेरलाथन सुरुवातीच्या सत्रात चाचपडत खेळताना दिसत होता. मात्र दुसऱ्या सत्रात त्याला सूर सापडायला लागल्यानंतर दिल्लीच्या रेडर्ससाठी तो मोठी डोकेदुखी ठरला.
गिरीश एर्नेकला मात्र या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. उजवा आणि डावा कोपरारक्षकामध्ये असणारा ताळमेळ आजच्या सामन्यात पहायला मिळाला नाही. त्यामुळे दिल्लीच्या रेडर्सनी पुण्याच्या डिफेन्समध्ये गिरीश एर्नेकला आपलं लक्ष्य केलं, आणि बहुतांश प्रमाणात त्यांना यात यश मिळालं.
मिराज शेख पुन्हा अपयशी, आनंद पाटील मात्र चमकला –
कबड्डीत कर्णधाराने केलेल्या कामगिरीवर त्या संघाची कामगिरी ठरत असते. दुर्देवाने दबंग दिल्लीचा कर्णधार मिराज शेख आजच्या सामन्यातही अपयशी ठरला. दोन्ही सत्रांमध्ये मिराजला रेडमध्ये एकही पॉईंट मिळवता आला नाही. पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी अभ्यास करुन मिराजला मैदानाबाहेर बसवून ठेवण्याची युक्ती लढवली आणि त्यात त्यांना यश आलं. संपूर्ण सामन्यात मिराज शेख जवळपास १५ मिनीटं बाहेर होता. मात्र ज्यावेळी मिराजला रेड करण्याची संधी मिळाली, त्यावेळी एकदाही पॉईंट आणण्यात त्याला यश आलं नाही. याचसोबत बचावादरम्यानही मिराजने राजेश नरवालला चुकीच्या पद्धतीने टॅकल करत पुणेरी पलटणला अनेक पॉईंट बहाल केले.
मिराजला आजच्या सामन्यात अपयश आलं असलं तरीही महाराष्ट्राच्या आनंद पाटीलने या सामन्यात दिल्लीची कमान सांभाळली. आनंद पाटील रेडींगमध्ये तब्बल ८ पॉईंट मिळवत संघाला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रात आनंदने रेडींगमध्ये धर्मराज चेरलाथनला केलेला टो टच, संदीप नरवालवर केलेले रनिंग हँड टच हे निव्वळ पाहण्यासारखे होते. दुसऱ्या बाजूने बदली खेळाडू आर.श्रीरामने त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कोणत्याही खेळाडूंकडून त्यांना मदत मिळाली नसल्यामुळे दिल्लीचे सामन्यात परतण्याचे प्रयत्न तोकडे पडले.
याव्यतिरीक्त दबंग दिल्लीचे निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे हे सामन्याच्या सुरुवातीपासून फॉर्मात नव्हते. निलेश शिंदेला फॉर्ममध्ये येण्यासाठी दुसऱ्या सत्राची वाट पहावी लागली. बाजीराव होगडेनाही पहिल्या सत्रात टॅकल करताना क्षुल्लक चुका करुन पुण्याच्या संघाला पॉईंट बहाल केले. मात्र दुसऱ्या सत्रात या दोन्ही खेळाडूंनी आपला खेळ सुधारत काही चांगले पॉईंट मिळवले मात्र तोपर्यंत दिल्लीने सामन्यावरची आपली पकड गमावली होती.
५ तारखेला म्हणजेच शनिवारी दबंग दिल्लीचा सामना यू मुम्बासोबत होणार आहे. मुम्बाच्या संघाला पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी हरियाणाच्या संघावर मात करत पुनरागमन केलं होतं. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात दबंग दिल्लीचा संघ मुम्बाचं आव्हान कसं पेलतो हे पहावं लागणार आहे.