प्रो-कबड्डीच्या तामिळ थलायवाज संघाची सुरुवात काही चांगली झालेली नाहीये. सचिनची मालकी असलेल्या या संघाला नवीन पर्वाच्या पहिल्याच सामन्यात तेलगु टायटन्सच्या संघाने पराभवाचा धक्का दिला आहे. प्रो-कबड्डीला मिळणारी प्रसिद्धी पाहता, यंदाच्या पर्वात ४ नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. याचसोबत यंदाचा हंगाम हा जवळपास ३ महिने चालणार असल्याने क्रीडारसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. आजच्या पहिल्याच सामन्यात तेलगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवाज या सामन्यात तेलगूने तामिळ थलायवाज या संघावर ३२-२७ अशी मात केली.
सुरुवात अटीतटीची –
तामिळ थलायवाज हा संघ स्पर्धेत नवीन असल्यामुळे त्यांच्या संघाची मदार ही कर्णधार अजय ठाकूरच्या खेळावर होती. त्यामुळे तेलगु टायटन्स संघाचा पगडा भारी असेल असा सर्वांचा होरा होता. मात्र अनपेक्षितरित्या तामिळ थलायवाज संघाने राहुल चौधरीच्या तेलगु टायटन्सला चांगली टक्कर दिली. सुरुवातीची ५ मिनीटं दोन्ही संघ बरोबरीत चालत होते. काही वेळा तेलगु संघाने सामन्यात ४ गुणांची आघाडीही घेतली. मात्र तामिळ थलायवाज संघाने तितक्याच जोरदार कमबॅक करत ही आघाडी भरुन काढली.
मात्र यानंतर राहुल चौधरी आणि निलेश साळुंखेने तामिळच्या बचाळफळीवर आक्रमण करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. तेलगू टायटन्सकडून झालेल्या हल्ल्याला अजय ठाकूरशिवाय कोणत्याही खेळाडूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस तेलगू टायटन्सच्या संघाने १७-११ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात तेलगुचा आक्रमक पवित्रा –
दुसऱ्या सत्रात मात्र तेलगु टायटन्सने आपल्या खेळात आक्रमक पवित्रा घेतला. राहुल चौधरीसोबत, मराठमोळ्या निलेश साळुंखेनेही भरघोस गुणांची कमाई करत तामिळ थलायवाजला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या सत्रातली तेलगु टायटन्सची आक्रमकता पाहून तामिळ थलायवाजचा संघही काही क्षणासाठी भांबावलेला दिसला होता.
या सत्रात तेलगुने तामिळ थलायवाजवर १० गुणांची आघाडी घेतली. राहुल चौधरीला मात्र दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनी टार्गेट केलं, दुसऱ्या सत्रात राहुल चौधरीला तब्बल ५ वेळा बाद केलं.
अजय ठाकूर एकखांबी तंबू –
तामिळ थलायवाज संघाचा पहिल्या सत्रातला खेळ हा अतिशय निराशाजनक होता. संघाची संपूर्ण मदार ही अजय ठाकूरवर होती. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून कोणत्याही क्षणी सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे महत्वाच्या क्षणी समोरच्या संघावर आघाडी घेण्याच्या अनेक संधी तामिळ थलायवाजने वाया घालवल्या.
संघाच्या बचावपटूंची अजय ठाकूरला मिळायला हवी तशी साथ मिळाली नाही. तामिळ संघाचा महत्वाचा बचावपटू अमित हुडाचे प्रतिस्पर्ध्याला टॅकल करण्याचे अनेक प्रयत्न फसले. मात्र दुसऱ्या पर्वाच्या अखेरीस तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनी काही चांगले गुण मिळवत आपल्या पराभवाचं अंतर ७ गुणांपेक्षा कमी केली. ज्यामुळे पराभव पदरी पडूनही तामिळ थलायवाजला या सामन्यातून १ गुण मिळाला आहे.
याव्यतिरीक्त तेलगु टायटन्सकडून विशाल भारद्वाज या नवोदित बचावपटूने सामन्यात ५ गुण मिळवले. नवीन पर्वातला नवीन संघ असूनही अजय ठाकूरच्या तामिळ थलायवाजने तेलगू टायटन्सला काही क्षेत्रात चांगली टक्कर दिली,मात्र सामन्यावरची आपली पकड तेलगु टायटन्स संघाने ढिली होऊ दिली नाही. त्यामुळे संघातील खेळाडूंनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर, तेलगू टायटन्सच्या संघाने आपला पहिला विजय संपादित केला.