प्रो-कबड्डीची सुरुवात विजयाने करणाऱ्या तेलगू टायटन्सला आज पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रो-कबड्डीमधल्या नवोदीत यूपी योद्धाज या संघाने राहुल चौधरीच्या अनुभवी संघावर ३१-१८ अशी मात केली आहे. घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरलेली आहे. पर्वाच्या सुरुवातीला तामिळ थलायवाज संघावर मात केल्यानंतर तेलगू टायटन्सला पाटणा पायरेट्स, बंगळुरु बुल्स आणि आज यूपी योद्धाज या संघांकडून हार पत्करावी लागली आहे.
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ हे बरोबरीत चालत होते. मात्र उत्तर प्रदेशच्या संघात आक्रमकपणा जाणवत होता. दोन्ही संघ सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कोणालाही २ गुणांच्यावर आघाडी घेण्यात यश मिळवत नव्हतं. मात्र यानंतर नितीन तोमर , रिशांक देवाडीगा आणि राजेश नरवाल या त्रिकुटाने उत्तर प्रदेशसाठी सामन्याचं चित्रच पालटलं. तिघांच्याही झंजावाती रेडसमोर तेलगू टायटन्सचे बचावपटू भेदरलेले दिसत होते. रोहीत राणासारखा कसलेला बचावपटू सलग अपयशी जातो आहे, तेलगूच्या संघासाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. तेलगूच्या संघाकडून युवा खेळाडू विशाल भारद्वाजचा अपवाद वगळला तर एकाही बचावपटूने चांगली कामगिरी केली नाही.
तेलगू टायटन्सने आजच्या सामन्यात निलेश साळुंखेला पहिल्या ७ जणांमध्ये जागा दिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रेडींगचा भार राहुल चौधरीच्या खांद्यावर आला. सुरुवातीला राहुलनेही काही चांगले पॉईंट घेत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विकासनेही त्याला चांगली साथ दिली. मात्र यूपीच्या बचावपटूंनी दोघांनाही आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. ज्याचा तणाव साहजिकपणे तेलगूच्या संघावर आला. निलेश हा गेले कित्येक सामने राहुल चौधरीसोबत संघात रेडींगची जबाबदारी सांभाळतो आहे, त्यामुळे सलग पराभव पदरी पडत असताना त्याला विश्रांती देण्यापाठीमागचं कारण न समजण्यासारखं आहे. त्यातचं दुसऱ्या सत्रात जेव्हा निलेश साळुंखेला संघात स्थान देण्यात आलं तेव्हा त्याने पहिल्याच रेडमध्ये काही सुरेख पॉईंट घेत आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. मात्र तोपर्यंत सामन्यावर उत्तर प्रदेशच्या संघाने आपली पकड मजबूत बसवली होती.
उत्तर प्रदेशच्या संघाकडून कर्णधार नितीन तोमरने रेडींगमध्ये काही चांगले पॉईंट मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्याला महेश गौड, राजेश नरवाल आणि रिशांक देवाडीगानेही चांगली साथ दिली. मात्र या सर्वांमध्ये महत्वाचा खेळाडू ठरला तो कोपरारक्षक नितेश कुमार. त्याने तेलगूच्या रेडरवर आक्रमण करत सामन्यात ५ पॉईंट मिळवले.
सलग ३ पराभव पदरी पडल्यामुळे तेलगूला आपल्या संघात बदल करण्याची मोठी गरज असल्याचं दिसून येतंय. यंदाचा हंगाम मोठा असला तरीही ४ नवीन संघाचा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात तेलगू टायटन्स संघात नेमके कोणते बदल घडवून आणतं हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – गुजरात ठरले दबंग, दिल्लीचा पराभव