आक्रमण व बचाव या दोन्ही आघाडय़ांवर सपशेल निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटण संघापुढे घरच्या मैदानावर प्रतिष्ठा टिकवण्याचेच आव्हान निर्माण झाले आहे. प्रो कबड्डी लीगमधील उर्वरित चार सामन्यांमध्ये त्यांना हे ध्येय साकारण्यासाठी सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे.शिवछत्रपती क्रीडानगरीत रविवारपासून या लीगमधील शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू होत आहेत. साखळी गटात अव्वल स्थानावर असलेल्या यू मुंबा संघाने ५० गुणांसह उपान्त्य फेरीकडे कूच केली आहे. तेलुगू टायटन्स संघाने ४५ गुणांसह बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी जयपूर पिंक पँथर्स, बंगळुरू बुल्स, दिल्ली दबंग यांच्यात चुरस आहे.पुणे संघाला रविवारी पहिल्या सामन्यात दिल्ली संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता होणार आहे. कर्णधार वझीर सिंग व प्रवीण नेवाळे या दोनच खेळाडूंवर पुण्याच्या चढायांची मदार आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाकडून या दोन खेळाडूंची अधिकाधिक वेळा कशी पकड होईल, हीच रणनीती वापरण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या दहा सामन्यांमध्ये पुणे संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यांनी बंगाल संघावर मात केली आहे तर तेलुगू संघाने त्यांना बरोबरीत रोखले होते. या दोन सामन्यांचा अपवाद वगळता पुण्याच्या खेळाडूंनी सर्वच आघाडींवर निराशा केली आहे. अनेक वेळा सात-आठ गुणांची आघाडी घेऊनही त्यांना सामना गमवावा लागला आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी पुणे संघाचे प्रशिक्षक अशोक शिंदे व त्यांच्या शिष्यांना घ्यावी लागणार आहे. शिंदे हे स्वत: पुण्याचे असल्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांना मोठय़ा अपेक्षा आहेत. पुण्याच्या सामन्यानंतर जयपूर व बंगाल यांच्यात लढत होईल. बाद फेरीसाठी हा सामना जिंकण्यासाठी जयपूरचे खेळाडू कसोशीने प्रयत्न करतील असा अंदाज आहे.
घरच्या मैदानावर पुण्यापुढे प्रतिष्ठा टिकवण्याचेच आव्हान!
आक्रमण व बचाव या दोन्ही आघाडय़ांवर सपशेल निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटण संघापुढे घरच्या मैदानावर प्रतिष्ठा टिकवण्याचेच आव्हान निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-08-2015 at 07:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league