लख्ख काळोखात प्रकाशित असलेल्या स्क्रीनवर १०, ९, ८ पासून शून्यापर्यंत उलटगणती होते आणि अचानक वीज लकाकावी तसे रंगीबेरंगी दिव्यांचे अनेक प्रकाशझोत समोर दिसतात.. क्षणार्धात कबड्डीचे वीरगीत सुरू होते आणि एकेक करीत दोन्ही संघांचे मैदानावर आगमन होते.. प्रकाशाचा एक अनोखा खेळ खेळाडूंना दिपवून टाकतो.. सुमारे १४ कॅमेऱ्यांची हे क्षण टीपण्यासाठी लगबग सुरू होते.. क्रिकेटच्या नभांगणात वावरणाऱ्या स्पायडर कॅमेऱ्याप्रमाणे छतावर डोम कॅमेरा सहजपणे लक्ष वेधतो.. वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात गुरुवारी ‘प्रो-कबड्डी’च्या रंगीत तालमीचे वातावरण आणि त्यातील भव्यदिव्यपणा हा या सोनेरी प्रवासाची साक्ष देत होता. ‘प्रो-कबड्डी’साठी खास तयार करण्यात आलेल्या मॅटवर खेळाडूंचा सराव सुरू असताना कबड्डी हा खेळ आणि त्यातील अनेक तांत्रिक बाबी नव्याने समजून घेणारे टीव्हीचे कॅमेरामन खेळातील नेमके कोणते क्षण टिपायचे हे शास्त्रशुद्धपणे जाणकारांकडून समजून घेत होते. खेळाला प्रत्यक्ष व्यासपीठावर नेण्याच्या दृष्टीने सौंदर्यवती सूत्रसंचालिका, विविध प्रकारच्या प्रकाशयोजना, नेपथ्य, प्रेक्षागृह, ध्वनीसंयोजन आदी सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठी मोठा फौजफाटा गुंतला होता. कबड्डीला हे व्यावसायिक रूप देताना अनेक हात ‘साथी हात बटाना’ हे सूत्र जोपासून कार्यरत होते.
प्रो-कबड्डी लीगची (पीकेएल) ऐतिहासिक मुहूर्तमेढ रोवण्यास आता फक्त काही तासांचा अवधी बाकी आहे. शनिवार, २६ जुलैला रात्री ठीक ८ वाजून २ मिनिटांनी ‘लाइट, कॅमेरा आणि कबड्डी’ हे शब्द उच्चारताच मुंबईतील वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शिटी वाजवली जाईल आणि कबड्डीमधील एका नव्या पर्वाला प्रारंभ होईल. ‘स्टार स्पोर्ट्स’ या लोकप्रिय टीव्ही वाहिनीच्या माध्यमातून अब्जावधी क्रीडारसिकांना हा थक्क करणारा थरार घरोघरी पाहता येईल. सोशल मीडियावरसुद्धा ‘पीकेएल आपल्या टीव्हीवर आवर्जून पाहा. खेळाचा प्रचार-प्रसार होईल आणि कबड्डीला चांगले दिवस येतील’ अशा प्रकारचे एक जोरदार अभियान चालू आहे. अनेक मोठमोठय़ा क्रीडा स्पर्धाना टीव्हीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’ने केलेल्या प्रो-कबड्डीच्या खास जाहिरातीसुद्धा या स्पध्रेची उत्सुकता वाढवत आहेत.
‘प्राइम टाइम’ला कबड्डीचे प्रक्षेपण होणार असल्यामुळे ‘प्रो-कबड्डी’च्या संयोजकांनी हा खेळ अधिक आकर्षक होईल आणि मनोरंजनापेक्षा खेळातील चुरस जपली जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. एनएससीआयला सायंकाळच्या सत्रात झालेल्या सरावाप्रसंगी ‘यु मुंबा’सह अनेक संघांची नव्या नियमांना सामोरे जाऊन खेळताना नवी मानसिकता आणि व्यूहरचना पाहायला मिळाली. ‘टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात..’ हे गाणे आता कबड्डीपटूंनी चांगलेच जोपासले होते. कारण प्रो-कबड्डीच्या प्रत्येक सामन्याचे गणित तसे घडय़ाळावर चालणारे. प्रत्येकी २० मिनिटांची दोन सत्रे. या दोन संत्रांमध्ये पाच मिनिटांची विश्रांती. हे सारे कबड्डीचे व्यावसायिक गणित जपण्यासाठी. समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या घडय़ाळावर ही आकडेमोड पाहायला मिळत होती. प्रत्येक खेळाडूला चढाईसाठी ३० सेकंदांचा वेळसुद्धा समोर उलटगणती पद्धतीने लक्ष वेधत होता. खेळाडू आकडे पाहून मनात ठोकताळे बांधत होते. याचप्रमाणे स्क्रीनवरील तीन दिवे मात्र सहजपणे लक्ष वेधत होते. तिसरी चढाई निष्फळ ठरल्यास प्रतिस्पर्धी संघाला बोनस गुण मिळणार आणि चढाईपटू बाद होणार, हे निश्चित असल्यामुळे या चढाईचे दडपण अधिक. पण दुसऱ्याच चढाईत गुण मिळाल्यास पुन्हा तीन चढायांचे गणित सुरू. हे नवे शास्त्र आता प्रशिक्षकांनीसुद्धा चांगल्याच पद्धतीने अंगीकारले होते.
‘यु मुंबा’चे प्रशिक्षक रवी शेट्टी म्हणाले, ‘‘तिसरी चढाई निर्णायक ठरणार म्हणजे पहिल्या दोन निष्फळच घालवायच्या असे नाही. प्रो-कबड्डीच्या प्रत्येक सामन्यात ८० चढाया होणार. यापैकी ४० आमच्या आणि ४० प्रतिस्पध्र्याच्या. या दृष्टीने आम्ही खास व्यूहरचना केली आहे. साखळीतील १४ सामन्यांपैकी १०पेक्षा अधिक सामने जिंकून बाद फेरीत जाण्याचे आम्ही ठरवले आहे.’’
‘रिप्ले’ हा कोणत्याही खेळाच्या प्रक्षेपणाचा आत्मा. कबड्डीमध्ये एकामागोमाग एक चढायांची जंत्री असते. पण संयोजकांनी यशस्वी झटापटीनंतर रिप्लेसाठी काही सेकंदांचा वेळ गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे खेळ पाहणे अधिक सुखकर होईल, असे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले.

Story img Loader