प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाला रविवारी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू बंदिस्त स्टेडियमवर शानदार प्रारंभ होत असून, पहिल्याच दिवशी गतविजेत्या पाटणा पायरेट्सची तमिळ थलायव्हाजशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्राच्या संघांमध्येही रंगतदार लढत होणार आहे.
भारताचा कर्णधार अजय ठाकूरवर तमिळ थलायव्हाजची मदार आहे, तर मागील हंगामांमध्ये आपल्या दमदार चढायांनी विक्रम प्रस्थापित करणारा प्रदीप नरवाल पाटणा पायरेट्सची धुरा सांभाळणार आहे. मागील तीन हंगामांमध्ये विजेतेपदाचा दावा करणाऱ्या पाटण्याचे पारडे तमिळपेक्षा निश्चितच जड मानले जात आहे.
‘‘येत्या हंगामात नव्या कौशल्यासह मी उतरणार असून, यंदा पुन्हा विजेतेपद पटकावू,’’ असा विश्वास प्रदीपने व्यक्त केला. याचप्रमाणे तमिळ संघाचा कर्णधार अजय म्हणाला की, ‘‘मागील हंगामात आमच्याकडे युवा खेळाडूंचा भरणा होता. मात्र यंदाच्या संघात अनुभवी खेळाडूसुद्धा असल्यामुळे आम्ही परिपक्वतेने खेळू.’’
पुणेरी पलटणचा संघ यंदाच्या हंगामात सर्वात धोकादायक असेल, असे मत यू मुंबाचा उपकर्णधार धरमराज चेरलाथनने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘आमच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय आहे. इराणचा बचावपटू फझल अत्राचालीवर आमची प्रमुख मदार आहे.’’पुणेरी पलटणचा कर्णधार गिरीश ईर्नाक हंगामाविषयी म्हणाला की, ‘‘दडपण आणि आव्हाने या दोन्हीचा विचार करीत आहोत. पण अनुप कुमारसारखा शांत कर्णधार व्हायला आवडेल.’’
बेंगळूरुचे सामने नागपूरला?
मागील हंगामाप्रमाणेच बेंगळूरु बुल्सचे सामने नागपूरला खेळवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. याचप्रमाणे यूपी योद्धा संघाच्या सामन्यांचेही ठिकाण अद्याप निश्चित झाले नसून, हे सामने नोएडा येथे होण्याची दाट शक्यता आहे.
आजचे सामने
- तमिळ थलायव्हाज वि. पाटणा पायरेट्स
- यू मुंबा वि. पुणेरी पलटण
- वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.