पुणे : अखेरच्या मिनिटातील खेळात दबंग दिल्लीवर लोण देत बंगळूरु बुल्सने ४७-४३ असा विजय मिळवून प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाच्या गुणतक्त्यातील आपली आघाडी कायम राखली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीने बंगळूरु बुल्सवर लोण देत आघाडी मिळवली होती. मात्र, अखेरच्या मिनिटातील खेळात सामन्याचे पारडे फिरले. बंगळूरुच्या भरतने खोलवर चढाई करताना दिल्ली संघाचे शिल्लक तीनही गडी टिपले आणि लोण परतवत बंगळूरू बुल्सला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरची चढाई सावध करत बंगळूरु बुल्सने रोमहर्षक विजय मिळवला. बंगळूरुकडून भरतने चढाईत सर्वाधिक २० गुणांची नोंद केली. दिल्लीच्या नवीन कुमार आणि आशु मलिकचे प्रयत्न अपयशी ठरले.
दुसऱ्या सामन्यात गुजरात सुपर जायंट्सने तेलुगू टायटन्सचे आव्हान ३०-१९ असे परतवून लावले. सौरव गुलियाचा बचाव आणि प्रतिक दहियाची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. अन्य लढतीत, यू मुम्बाने बंगाल वॉरियर्सवर ३६-२५ अशी मात केली.