‘प्रो-कबड्डी लीग’चे सुवर्णस्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. भारतातील महत्त्वाचे आठ संघ, ६० सामने आणि एक कोटी रुपयांचे इनाम यांचा समावेश असलेल्या या आयपीएलप्रमाणे फ्रेंचायझीवर आधारित लीगला वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. प्रो-कबड्डीचा लिलाव लखलख चंदेरी तेजाने उजळल्यानंतर आता स्पध्रेचा भव्यदिव्यपणा कसा असेल, याविषयी क्रीडारसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी प्रो-कबड्डीची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये प्रथम यजमान यू मुंबाचा विजयी सलामी नोंदवण्यासाठी कस लागेल. अभिषेक बच्चनच्या मालकीच्या आणि नवनीत गौतमच्या नेतृत्वाखालील जयपूर पिंक पँथर्सचा संघसुद्धा यू मुंबा संघाला मुंबईत हरवण्यासाठी उत्सुक आहे. दुसऱ्या सामन्यात हनुमान उडीसाठी खास ओळखला जाणारा सांगलीतील काशिलिंग आडके ऊर्फ काश्याचा डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना लाभणार आहे. लिलावामध्ये दहा लाख रुपयांची बोली लागलेल्या काश्याच्या दबंग दिल्लीचा पहिला सामना मनजित चिल्लरच्या नेतृत्वाखालील बंगळुरू बुल्स संघाशी होणार आहे.
यू मुंबाचे प्रशिक्षक रवी शेट्टी म्हणाले की, ‘‘गेले काही दिवस सुरू असलेल्या सराव शिबिरातून आमच्या संघाची बलस्थाने आणि कच्च्या दुव्यांवर आम्ही मेहनत घेतली आहे. जीवा कुमार आणि विशाल माने यांच्यावर आमच्या बचावाची धुरा असेल, तर कर्णधार अनुप कुमार शब्बीर, बापू शर्फुद्दीन आणि रिशांक देवाडिगा यांच्यावर आक्रमणाची मदार असेल.’’ प्रो-कबड्डीमधील अभियानाची विजयानिशी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघांची उत्सुकता असली तरी आमचे पारडे जड असेल, असे मत कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केले. जयपूरचा कर्णधार नवनीत गौतम म्हणाला की, ‘‘यू मुंबाशी मुंबईत लढायचे असले तरी आम्ही तोलामोलाची टक्कर देऊ. प्रशिक्षक के. भास्करन यांनी गेले काही दिवस सराव सत्रात चांगली तयारी करून घेतली आहे.’’
‘‘प्रो-कबड्डी स्पध्रेच्या प्रारंभाप्रसंगी उद्घाटन सोहळ्याचा रंगारंग कार्यक्रम नसेल. फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. चीअरलीडर्स, मनोरंजनात्मक कार्यक्रम वगैरे कोणत्याही गोष्टींना यात स्थान देण्यात आलेले नाही. फक्त खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी डीजेचा समावेश असेल,’’ अशी माहिती यू मुंबा संघाचे सीईओ सुप्रतीक सेन यांनी दिली. परंतु पहिल्या दिवशी प्रो-कबड्डीचे सामने पाहण्यासाठी तारे-तारकांची मांदियाळी एनएससीआयमध्ये अवतरणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बच्चन कुटुंबीय, अजय देवगन, सुनील शेट्टी आदी कलावंतांचा यात समावेश असल्याचे समजते.
आजचे सामने
यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स
दबंग दिल्ली वि. बंगळुरू बुल्स
वेळ : रात्री ७.४५ वा. ते १०.३० वा.पर्यंत
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स (इंग्रजी), स्टार गोल्ड (हिंदी)
पाकिस्तानी खेळाडूंची प्रतीक्षा कायम
प्रो-कबड्डीमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. एकंदर चार खेळाडू प्रो-कबड्डीमध्ये तीन संघांकडून खेळणार होते, परंतु व्हिसाच्या समस्येमुळे त्यांना भारतात येण्यास उशीर होता. वासिम सज्जड (पाटणा), अतिफ वहीद आणि वाजिद अली (तेलुगू टायटन्स) यांच्यासह एक सामनाधिकारी अशा चौघांना व्हिसा मंजूर झाला असून, ते लवकरात लवकर भारतात पोहोचतील, अशी अपेक्षा भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे सहाय्यक सचिव देवराज चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. ‘‘पाकिस्तानहून भारतात येण्यासाठी अतिशय कमी फ्लाइट्स उपलब्ध असतात. दुबईमार्गे भारतात येणे सोपे असले तरी रमझान जवळ आल्यामुळे तिकिटांच्या दराने अस्मानी उड्डाणे घेतली असली तरी ती उपलब्ध होत नाहीत,’’ अशा अडचणी चतुर्वेदी यांनी व्यक्त केल्या. जयपूर पिंक पँथर्सचा नासिर अली आणि एका अधिकाऱ्याचा व्हिसा नामंजूर करण्यात आल्यामुळे निर्माण झालेला पेच संयोजकांनी सोडवला आहे. नासिरच्या जागी महाराष्ट्राच्या प्रशांत चव्हाणचा जयपूर संघात समावेश करण्यात आला आहे, असे समजते.

Story img Loader