अटीतटीची लढत बरोबरीत ;टायटन्सचा यजमान बुल्सवर सहज विजय

क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा.. एक-एक गुणासाठी रंगलेली चढाओढ.. पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्याने बंगळुरूमधील कबड्डीप्रेमींची मने जिंकली. बंगालचा अभेद्य बचाव भेदण्यात पुण्याला अखेरच्या क्षणाला अपयश आल्याने सामना ३४-३४ अशा बरोबरीवर सुटला.

प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील मंगळवारी झालेल्या सामन्यात ३८व्या मिनिटाला दीपक हुडाची पकड करून विशाल मानेने सुपर पकडीसह बंगालला ३४-३२ अशी दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. मात्र यांग कुल ली याची पकड आणि सोनू नरवालची यशस्वी चढाई यांच्या जोरावर पुण्याने ३४-३४ अशी बरोबरी मिळवली. हुडाला अखेरच्या चढाईत गुण घेण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णीत निकालावरच सुटला. पुण्याकडून चढाईत हुडाने ८, अजय ठाकूरने ६ आणि सोनू नरवालने ४ गुणांची कमाई केली, तर पकडीत रवींदर पहल (४) व जोगिंदर नरवाल (४) यांनी संघर्ष केला. बंगालकडून पकडीत विशालने दोन सुपर पकडीसह सहा, तर नितीन मदनेने एक सुपर पकडीसह दोन गुणांची कमाई केली. कर्णधार निलेश शिंदे (३), तर यांग कून ली, अमित चिल्लर व सी. अरुण यांनी प्रत्येकी एक गुण कमावला.

दरम्यान, पहिल्या सामन्यात तेलुगु टायटन्स संघाने भक्कम बचाव करत बंगळुरू बुल्सच्या चढाईपटूंना वेसण घालून सोप्या विजयाची नोंद केली. बुल्सचा प्रमुख खेळाडू रोहित कुमारची सहा वेळा पकड करून टायटन्सने ३२-२४ असा विजय मिळवला. टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने १४ पैकी ९ यशस्वी चढाई करून यजमानांचा बचाव खिळखिळा केला.

टायटन्सने अवघ्या ८ मिनिटांत ११-१ अशी आघाडी घेत यजमानांना हतबल केले. मात्र एक एक गुणांची कमाई करून बुल्सने आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. रोहितने एका चढाईत टायटन्सच्या तीन खेळाडूंना बाद करून हे अंतर १०-१५ असे कमी केले. पण राहुलची जबरदस्त चढाई आणि एस. महालिंगम (२), सागर कृष्णा (२), संदीप नरवाल (५) व संदीप धुल (३) यांच्या बचावाच्या जोरावर टायटन्सने विजय निश्चित केला. टायटन्सने दोन लोण दिले.

आजचे सामने

बंगळुरू बुल्स वि. जयपूर पिंक पँथर्स

आइस दिवाज वि. फायर बर्ड (महिला लीग)

सामन्याची वेळ : ८ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

((   पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यानचा क्षण  )))

Story img Loader