कबड्डी लीगमुळे कल्याणच्या गिरीश इर्नाकचे आयुष्य पालटले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बंगाल वॉरियर्सचा हा हरहुन्नरी डावा कोपरारक्षक सहजपणे क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. बंगालच्या आतापर्यंतच्या दमदार प्रवासात गिरीशचा सिंहाचा वाटा आहे. तसे मागील दोन हंगामांमध्ये पाटणा पायरेट्सकडून खेळतानाही त्याची गुणवत्ता दिसून आली होती. त्यामुळेच गेल्या वर्षी भारत पेट्रोलियममध्ये त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळाली. प्रो कबड्डीमुळे जीवनाला स्थर्य मिळाले, असे गिरीश अभिमानाने सांगतो.
गिरीश हा मूळचा अहमदनगरचा. वडील रेल्वेत नोकरीला असल्यामुळे इर्नाक कुटुंबीय कल्याणमध्ये स्थायिक झाले आहे. आपल्या कबड्डीचा प्रवास उलगडताना २६ वर्षीय गिरीश म्हणाला, ‘‘ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये शिकत असताना मला सुनील कोळी नावाचे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. त्यांना माझ्यात एक खेळाडू दडला असल्याची जाणीव होती. त्यामुळे ते माझ्यावर विशेष मेहनत घ्यायचे. लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, धावणे यांसारख्या अ‍ॅथलेटिक्स प्रकारांसोबत कबड्डी खेळायलाही मी प्रारंभ केला. मग दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कल्याण पश्चिमेच्या ओम कबड्डी संघातून खेळायला सुरुवात केली. तिथे प्रशांत चव्हाण, पंकज चव्हाण, संतोष पडवळ यांचे मार्गदर्शन मिळाले आणि कबड्डीतच कारकीर्द घडवण्याचे निश्चित केले.’’
साकेत महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही वष्रे एअर इंडियात कंत्राटी तत्त्वावर गिरीशने नोकरी केली; पण त्यानंतर बंगळुरूच्या स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये बी. सी. रमेश यांच्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती; पण घरच्या अडचणीमुळे त्याला नोकरी सोडावी लागली. प्रो कबड्डी आल्यानंतर पाटण्याच्या डाव्या कोपरारक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. गेल्या दोन हंगामांमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाटण्याच्या वाटचालीत गिरीशचे महत्त्व अधोरेखित झाले.
यंदाच्या हंगामात गिरीश बंगालचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि सध्या पकडपटूंच्या यादीत तो अव्वल तिघांमध्ये दिमाखात विराजमान आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘बंगालचे दोन्ही कोपरारक्षक, मध्यरक्षक आणि प्रशिक्षक प्रताप शेट्टी भारत पेट्रोलियममध्ये आम्ही एकत्रित खेळतो. याचा फायदा बंगालकडून खेळताना होतो.’’
प्रो कबड्डीतील तीन वर्षांच्या अनुभवाविषयी गिरीश म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीत अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळते. शिवाय त्यांचे मार्गदर्शनसुद्धा मिळते. राकेश कुमार हा माझा सर्वात आवडता कबड्डीपटू आहे. पाटण्याकडून खेळताना राकेशकडून खेळातील बरेच बारकावे शिकायला मिळाले. डी. सुरेश कुमारकडूनही अनेक धडे मिळाले. महाराष्ट्र राज्यात दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार पटकावण्याचे माझे ध्येय आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

हंगाम पकडीचे गुण
पहिला २१
दुसरा २६
तिसरा १७

 

हंगाम पकडीचे गुण
पहिला २१
दुसरा २६
तिसरा १७