कबड्डी हा भारतातील पारंपरिक खेळ, पण क्रिकेटसारख्या खेळाला जेवढी प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर मिळाले तेवढे नक्कीच कबड्डीच्या वाटय़ाला आले नाही. पण आता प्रो-कबड्डीसारखी लीग आल्यावर मात्र कबड्डीला सुगीचे दिवस आले आहेत.
प्रो-कबड्डीने भारतीयांची मने जिंकली आणि घराघरांमध्ये अन्य खेळांसारखा हा खेळही उत्सुकतेने पाहिला जाऊ लागला आहे. कारण आतापर्यंतच्या चित्रवाणी वाहिनीवरील लोकप्रियतेच्या आकडेवारीने हेच सिद्ध होताना दिसत आहे.
प्रो-कबड्डीचा सलामीचाच सामना २१ कोटी ८ लाख चाहत्यांनी पाहिल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून ही आकडेवारी फुटबॉल विश्वचषकातील ब्राझील-क्रोएशिया यांच्यातील सलामीच्या लढतीपेक्षा दहा पट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतामध्ये जेवढी फुटबॉल विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीला उत्सुकता नव्हती, त्यापेक्षा बऱ्याच पटीने प्रो-कबड्डीसाठी असल्याचे सर्वासमोर आले आहे.
प्रो-कबड्डीच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये झालेले सामने तब्बल ७ कोटी २५ लाख चाहत्यांनी पाहिले. या वेळी प्रेक्षकांमध्ये कोणताही एक वयोगट पाहायला मिळाला नाही, तर तरुणांपासून ते विविध वयाच्या पुरुष आणि महिलांनीही या सामन्यांचा आनंद लुटला. प्रो-कबड्डी पाहणाऱ्यांमध्ये ३२ टक्के महिलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे, तर यामध्ये २२ टक्के लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. १५-२४ या वयोगटातील मुला-मुलींची यामध्ये २५ टक्के एवढी संख्या होती.
‘‘स्पर्धेच्या लोकप्रियतेबाबत माझ्या आणि चारू शर्मा यांच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न नव्हते. प्रत्येक स्तरांतून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला, मग ते क्रीडापटू असोत, राजकारणी किंवा सिनेतारका. या स्पर्धेमुळे भारतामध्ये नक्कीच क्रांती झाली आहे,’’ असे मशाल स्पोर्ट्सचे सहप्रवर्तक आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.
‘‘कबड्डीमध्ये संघटन, कौशल्य, रणनीती आणि वेग या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यामुळेच प्रो-कबड्डी लीगला उदंड प्रतिसाद लाभला,’’ असे स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा