प्रो-कबड्डी लीगचा पहिलावहिला विजेता मुंबईतच झळाळता चषक उंचावण्याची चिन्हे आहेत. कारण अंतिम सामन्यासह बाद फेरीचे चारही सामने बंगळुरूहून मुंबईच्या एनएससीआय क्रीडा संकुलात हलवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या एनएससीआय क्रीडा संकुलात प्रो-कबड्डी लीग या कबड्डीमधील व्यावसायिक अविष्काराला प्रारंभ झाला. त्यानंतर उर्वरित सातही संघांच्या मैदानांवर आता सामने चालू आहेत. प्रो-कबड्डीच्या पहिल्या टप्प्यातील अखेरचे साखळी सामने २४ ते २७ ऑगस्टदरम्यान बंगळुरूला क्रांतिवीरा इन्डोअर स्टेडियमवर होणार होते. त्यानंतर २९ ऑगस्टला उपांत्य फेरीचे दोन सामने होणार होते आणि मग ३१ ऑगस्टला तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाचा सामना तसेच अंतिम सामना रंगणार होता. परंतु प्रो-कबड्डीच्या संयोजकांची आता बंगळुरूऐवजी मुंबईच्या एनएससीआयला बाद फेरीच्या चारही सामन्यांसाठी पसंती असल्याचे समजते आहे.

Story img Loader