इंडियन प्रीमिअर लीग, इंडियन बॅडमिंटन लीग यांच्या धर्तीवर सुरू झालेल्या प्रो-कबड्डी लीगने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवर जबरदस्त गारुड निर्माण केले आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये स्पर्धेने प्रेक्षकसंख्येच्या नवनव्या विक्रमांना साद घातली आहे. पहिल्या पंधरवडय़ात तब्बल २८ कोटी ८० लाख प्रेक्षकांनी प्रो-कबड्डीचा आनंद टेलिव्हिजनच्या पडद्यावर आनंद लुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
कबड्डीने आधुनिकतेची कास कशी धरली आहे, हे पाहण्यासाठी चाहत्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार क्रिकेटनंतर प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम म्हणून प्रो-कबड्डीला पसंती मिळाली आहे. आयपीएलला पहिल्या १५ दिवसांत ४५ कोटी ३० लाख प्रेक्षकसंख्या लाभली होती. जागतिक सोहळा म्हणून प्रसिद्ध फुटबॉल विश्वचषक तसेच इंडियन बॅडमिंटन लीग, हॉकी इंडिया अशा समकालीन क्रीडा स्पर्धाना पिछाडीवर टाकत प्रो-कबड्डी स्पर्धेने २८ कोटी ८० लाख प्रेक्षकसंख्या मिळवली आहे. दुसऱ्या शब्दांत तीनपैकी एका भारतीयाने या स्पर्धेचा आनंद लुटला आहे.
दूरचित्रवाणीवर दबदबा असताना सोशल मीडियावरही प्रो-कबड्डीचाच बोलबाला आहे. फेसबुक, ट्विटरवर एक कोटी १० लाख नेटिझन्सनी स्पर्धेसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते सिनेतारे-तारकांनी हा खेळ आवडल्याचे आणि आवर्जून सामने पाहत असल्याच्या भावना प्रकट केल्या आहेत.
आयपीएलच्या माध्यमातून पहिल्यांदाच देशातील खेळांना फ्रँचायजी रुप मिळाले. क्रिकेटला लोकाश्रय होता, त्यामुळे आयपीएलचे यश अपेक्षित असे होते. मात्र प्रो-कबड्डीच्या बाबतीत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. परंतु ताज्या आकडेवारीने सर्व शंका-कुशंका दूर झाल्या आहेत. सकस, दर्जेदार कार्यक्रमाला प्रेक्षक साथ देतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
१५ दिवसांची आकडेवारी
स्पर्धेचे नाव प्रेक्षकसंख्या
आयपीएल ४५ कोटी ३० लाख
प्रो-कबड्डी २८ कोटी ८ लाख
फुटबॉल विश्वचषक १२ कोटी ९ लाख
हॉकी विश्वचषक ४ कोटी ८ लाख
हॉकी इंडिया लीग ९ कोटी ३ लाख
डब्ल्यूडबल्यूई ७ कोटी १ लाख
प्रेक्षकसंख्येत अ‘द्वितीय’ भरारी
इंडियन प्रीमिअर लीग, इंडियन बॅडमिंटन लीग यांच्या धर्तीवर सुरू झालेल्या प्रो-कबड्डी लीगने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवर जबरदस्त गारुड निर्माण केले आहे.
First published on: 15-08-2014 at 05:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league influences tv audiance