प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर मात करत विजेतेपत पटकावलं. अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचं आव्हान ५५-३८ असं मोडून काढत पाटण्याने प्रो-कबड्डीत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे. बाद फेरीच्या सामन्यातील इतिहासाप्रमाणेच प्रदीप नरवाल पाटण्याच्या विजयाचा हिरो ठरला. प्रदीपने सामन्यात चढाईत १९ गुणांची कमाई केली. त्याला मोनू गोयतने चढाईत ९ तर विजयने बचावफळीत ७ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

पहिल्या सत्रात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने आक्रमक चढाई करत पाटण्याला धक्का दिला. सचिन तवंर आणि राकेश नरवालने पाटण्याच्या बचावफळीला खिंडार पाडत अवघ्या पाचव्या मिनीटाला गतविजेत्या पाटण्याला ऑलआऊट केलं. गुजरातच्या या आक्रमक खेळापुढे पाटण्याचा संघ काहीसा बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला. मात्र यानंतर कर्णधार प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत यांनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत गुजरातच्या बचावफळीवर आक्रमण करायला सुरुवात केली. साखळी सामन्यांपासून गुजरातची बचावफळी प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमणाच्या दबावाखाली येते हे पहायला मिळालं आहे. याचाच प्रत्यय अंतिम सामन्यात आला. प्रदीप आणि मोनू गोयतने पहिल्याच सत्रात गुजरातने आपल्या संघावर चढवलेला लोण परतवत पहिल्या सत्राच्या अखेरीस १८-२१ अशी ३ गुणांची आघाडी घेतली.

पहिल्या सत्रात पाटण्याच्या संघाला आघाडी मिळवून देण्याचं काम हे पुन्हा एकदा चढाईपटूंनीच पार पाडलं. पाटण्याच्या बचावफळीचा निराशाजनक खेळ अंतिम सामन्यातही कायम राहिला. विशाल माने आणि सचिन शिंगाडे या महाराष्ट्राच्या जोडीला मध्यांतरापर्यंत सामन्यात एकही गुण कमावता आला नाही. मात्र विजय आणि जयदीपने सामन्यात काही चांगल्या पकडी करत आपल्या चढाईपटूंना आघाडी कायम राखण्यात मदत केली.

दुसऱ्या सत्रात गुजरातचा संघ पाटण्याला टक्कर देणार हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. गुजरातने दुसऱ्या सत्रात उंचपुऱ्या महेंद्र राजपूतला संघात जागा दिली. गुजरातची ही चाल मैदानात चांगलं काम करुन गेली. महेंद्रने चढाईत काही झटपट गुण मिळवत आपल्या संघाची पिछाडी काही गुणांनी कमी केली. मात्र प्रदीप नरवालच्या आक्रमक खेळापुढे गुजरातच्या बचावफळीचा निभावच लागला नाही. दबावाखाली येत गुजरातची बचावफळी सामन्यात चुका करत पाटण्याला गुण बहाल करत राहिली. या जोरावर पाटणा पायरेट्सने गुजरातला सामना संपायला ९ मिनीटं बाकी असताना दोन वेळा ऑलआऊट करत ३८-२६ अशी आघाडी घेतली.

यानंतही गुजरातकडून महेंद्र राजपूत आणि चंद्रन रणजीथ यांनी काही गुणांची कमाई करत पाटणा पायरेट्सवर ऑलआऊटचं संकट आणलं. मात्र सामन्यात केवळं एक खेळाडू शिल्लक राहिलेला असताना प्रदीप नरवालने गुजरातच्या २ खेळाडूंना बाद करत आपल्या संघावरचं ऑलआऊटचं संकट टाळलं. यानंतर पाटण्याच्या ३ खेळाडूंनी सुपर टॅकल करत पाटण्याच्या आघाडीत वाढ केली. गुजरातकडून दोन्ही इराणी कोपऱ्यांचं सामन्यात चांगली कामगिरी न होणं हे पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं. फैजल अत्राचली आणि अबुझार मेघानीशिवाय परवेश भैंसवाललाही या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. यानंतर प्रत्येक वेळा गुजरातचे सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने हाणून पाडला. यानंतर विजयाची औपचारिकता पाटण्याच्या खेळाडूंनी अगदी सहज पार पाडत पाचव्या पर्वाचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

Story img Loader