मातीतला खेळ अशी संभावना होणाऱ्या कबड्डीला प्रो कबड्डीच्या रुपाने नवे रुपडे लाभले आहे. मुंबईत सुरू झालेला स्पर्धेचा ताफा आता ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीत येऊन दाखल झाला आहे. आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखू न शकणाऱ्या पुणेरी पलटणला घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात विजयपथावर परतण्याची संधी आहे. क्रिकेटेत्तेर खेळांचे माहेरघर असणाऱ्या बालेवाडी क्रीडा संकुलात कबड्डी कबड्डीचा दम घुमणार आहे.
कबड्डीमधील पहिल्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लीगचे सामने येथे प्रथमच होत असल्यामुळे त्याबद्दल सर्वामध्ये कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. यजमान पुणेरी पलटण व तेलुगु टायटन्स यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्याने येथील कबड्डी उत्सवास प्रारंभ होत आहे. हा सामना रात्री आठ वाजता होणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट रोजी दररोज दोन सामने आयोजित केले जाणार आहेत.
या सामन्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपणासाठी १४ कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामध्ये दोन लांब तरंगत्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. आठ तरंगते स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. पाचशेहून अधिक मध्यम आकारांचे रंगीत दिवे बसविण्यात आले आहेत. सतत बदलत्या रंगांची त्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांना सामन्याचा आनंद जवळून घेता यावा यासाठी दोन मोठय़ा पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी तेथे बसविण्यात आलेल्या मॅट्सच्या मैदानाची चाचणीही घेण्यात आली.
कबड्डीतील मान्यवरांची नाराजी!
या सामन्यांकरिता बॉक्सिंग हॉलमध्ये जेमतेम दोन हजार प्रेक्षकांकरिता आसन व्यवस्था आहे. चारही दिवसांची सर्व तिकिटे संपली आहेत. सहसा कबड्डी स्पर्धेकरिता तिकिटे नसतात. तसेच कबड्डीतील अनेक संघटक राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे सर्वच स्पर्धाच्या वेळी व्यासपीठावर साधारणपणे ७० ते ८० संघटकांची आसन व्यवस्था असते. मात्र प्रो कबड्डी लीगचे संयोजन एका आंतरराष्ट्रीय चॅनेलकडे असल्यामुळे त्यांनी कबड्डी संघटकांना अगदी मोजक्याच सन्माननीय प्रवेशिका दिल्या आहेत. त्यामुळे कबड्डीतील अनेक मान्यवरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याचा अंदाज या लीगच्या संयोजकांना आधीच आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेत्यांना गौरव निधी देऊन शांत केले असल्याचे एका कबड्डी संघटकाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा