सुरेख फॉर्म कायम राखत जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स संघावर ३९-२३ असा विजय मिळवला. तसेच बंगळुरू बुल्सने अटीतटीच्या लढतीत पाटणा पायरेट्सवर ३७-३५ असा निसटता विजय मिळवला.
जयपूरच्या जसवीर सिंग आणि बंगालच्या नीलेश शिंदे यांनी आपापल्या संघासाठी दिमाखदार चढाया केल्या. बंगालच्या नितीन मदनेने जबरदस्त वेग आणि चपळतेचे प्रदर्शन केले. आठव्या मिनिटाला तीन खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या पँथर्सने बचाव भक्कम करत बंगालच्या आक्रमणाला रोखले. जसवीरने जयपूरला १८-९ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर नितीन आणि जसवीर यांनी झंझावाती आक्रमण करत बंगालच्या खेळाडूंना निष्प्रभ ठरवले.
दुसऱ्या लढतीत पाटण्याने पहिल्या सत्रात आघाडी मिळवली होती, मात्र त्यानंतर बंगळुरूच्या खेळाडूंनी झुंजार पुनरागमन करत विजयश्री खेचून आणली. अजय ठाकूरने १० गुण पटकावत बंगळुरूच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मनजीत चिल्लरने ५ गुणांसह त्याला चांगली साथ दिली. पाटणा संघातर्फे रवी दलालने ९ तर राकेश कुमारने ८ चढायांच्या गुणांसह जोरदार टक्कर दिली. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरले.
पाटणा शहरातील टप्प्यानंतरही यू मुंबा संघच ३६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. विजयपथावर परतलेल्या जयपूर पिंक पँथर्स संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Story img Loader