जयपूर पिंक पँथर्सने अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सचा ४१-३३ असा पराभव करीत प्रो कबड्डी लीगमध्ये सातवा विजय नोंदविला. उत्कंठापूर्ण झालेल्या दुसऱ्या लढतीत बंगळुरू बुल्सने तेलुगू टायटन्सला २८-२८ असे बरोबरीत रोखले. बंगालविरुद्ध सुरुवातीच्या ६-६ अशा बरोबरीनंतर जयपूरने वेगवान खेळ करीत १४ व्या मिनिटाला २३-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरापर्यंत बंगालने चांगली लढत देत ही आघाडी २६-१६ अशा गुणांपर्यंत आणली. उत्तरार्धातही बंगालने चिवट झुंज दिली. तथापि, उत्कृष्ट पकडी व खोलवर चढाया करीत जयपूरने हा सामना ४१-३३ असा जिंकला. त्याचे श्रेय जसवीर सिंग (८ गुण) व राजेश नरवाल (५ गुण) यांना द्यावे लागेल. बंगालच्या सुनील जयपाल (९) व नितीन मदाने (५) यांची लढत अपुरी ठरली. बंगळुरू संघाविरुद्ध तेलुगू संघाने पूर्वार्धात १३-८ अशी आघाडी मिळविली होती.  मात्र उत्तरार्धात खेळ रंगतदार झाला. ३६ व्या मिनिटाला त्यांच्याकडे २६-२३ अशी आघाडी होती. शेवटचे एक मिनिट बाकी असताना बंगळुरूच्या मनजित चिल्लरने चढाईत एक गुण मिळविला व पाठोपाठ त्याच्या संघाने तेलुगू संघाच्या राहुल चौधरीची पकड करीत २८-२८ अशी बरोबरी साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा