‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा विश्वचषक खेळल्यावरसुद्धा याआधी आम्हाला क्रीडारसिक सहज विसरायचे. परंतु प्रो-कबड्डी लीगमुळे आता आम्ही घराघरांत पोहोचलो आहोत. महिन्याभरात माझ्या फेसबुक अकाऊंटवरील मित्रांची आणि चाहत्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावर प्रतिसादाचा वर्षांव होतो आहे आणि बरेचशे चाहते प्रतिक्षेत आहेत. आता आम्ही कुठेही गेलो की आमच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी लोक उत्सुक असतात. प्रो-कबड्डीमुळे आम्हा खेळाडूंसाठी सुगीचे दिवस आले आहेत,’’ अशा भावना जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार नवनीत गौतमने व्यक्त केल्या.
‘‘जयपूरच्या सामन्यांप्रसंगी अमिताभ बच्चन यांचा संपूर्ण परिवार आमच्यासोबत होता. ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय होते’’, असे सांगताना गौतम अतिशय भावुक झाला होता. बंगळुरूमध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात प्रो-कबड्डीच्या चषकाचे शानदार अनावर करण्यात आले. यावेळी पाच संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि मालक मंडळी उपस्थित होती. यावेळी पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार राकेश कुमारने सांगितले की, ‘‘प्रो-कबड्डीमध्ये अनेक उदयोन्मुख खेळाडूंना देशविदेशातील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पध्रेतून मिळालेल्या गुणवत्तेचा ठसा आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेत आणि विश्वचषकात पाहायला मिळेल.’’ स्टार स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष अनुपम गोस्वामी यांनी सांगितले की, ‘‘खेळाला रूढ करण्यात टीव्हीची नेहमीच भूमिका महत्त्वाची असते. प्रो-कबड्डीमुळे नवे नायक क्रीडाक्षेत्राला मिळाले आहेत.’’
पुढील हंगामात संघ वाढण्याची शक्यता -गेहलोत
‘‘प्रो-कबड्डीने जी उंची गाठली आहे, त्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कबड्डीपटूंच्या कामगिरी आणि सामन्यातील रोमहर्षकतेमुळे या स्पध्रेला देशातील गावोगावी लोकप्रियता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनेक राष्ट्रांकडून याची प्रशंसा होते आहे. क्रिकेटमध्ये जसे शतक किंवा बळी महत्त्वाचा असतो, तसेच कबड्डीमध्ये एखादी निष्फळ चढाई काय फरक घडवू शकते, ही रंजकता सर्वाना अनुभवायला मिळत आहे,’’ असे विश्लेषण आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रो-कबड्डीच्या लोकप्रियतेमुळे आता आमच्याकडे फ्रेंचायझींची रांग लागली आहे. त्यामुळे पुढील हंगामात नऊ किंवा दहा संघ खेळण्याची शक्यता आहे.’’
महिलांची प्रो-कबड्डी लवकरच मैदानावर -अभिषेक
‘‘पुरुषांसाठीच्या प्रो-कबड्डी लीगला माझ्या अपेक्षेपेक्षा तीनशे ते चारशे टक्के अधिक प्रतिसाद मिळाला आहे. याचे श्रेय सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मशाल स्पोर्ट्स आणि प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्सला जाते. कबड्डी पाहणाऱ्यांच्या आकडेवारीत महिलांचे प्रमाणही कौतुकास्पद आहे. त्यामुळे लवकरच महिलांसाठीची प्रो-कबड्डी सुरू करण्याच्या आम्ही विचारात आहोत,’’ अशी प्रतिक्रिया जयपूर पिंक पँथर्सचे मालक आणि अभिनेते अभिषेक बच्चन यांनी व्यक्त केली.
‘‘प्रो-कबड्डीच्या यंदाच्या हंगामासाठी आम्हाला सर्वच ठिकाणी स्टेडियममधील रचनेची जुळवाजुळव करावी लागली. परंतु जयपूरच नव्हे, तर प्रत्येक संघाचे त्या शहरात कबड्डीचे खास स्टेडियम साकारले जाईल, याबाबत आम्ही सर्व संघमालक गंभीर आहोत,’’ असे अभिषेक पुढे म्हणाला.