आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांचा अनुभव मिळावा, याच हेतूने आम्ही प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी झालो आहोत, असे तेलुगू टायटन्सचे प्रतिनिधित्व करणारा इराणचा कबड्डीपटू मेराज शेखने सांगितले.
प्रो कबड्डी लीगमध्ये मेराज याच्यासह इराणचे सहा खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई स्तरावरील कबड्डी स्पर्धामध्ये भारतापुढे इराणचेच नेहमी आव्हान असते. त्याविषयी विचारले असता मेराज म्हणाला, ‘‘ताकदवान खेळ व शारीरिक तंदुरुस्ती याबाबत आमचे खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा वरचढ आहेत, मात्र कबड्डीच्या तांत्रिक कौशल्यामध्ये आम्हाला अजून खूप शिकायचे आहे. त्यादृष्टीनेच प्रो कबड्डी लीगचा अनुभव महत्त्वाचा आहे.’’
‘‘आगामी आशियाई स्पर्धेत भारताला मागे टाकण्याचे आमचे ध्येय आहे. मैदानाबाहेर खेळाडूंना ढकलणे, बोनस गुण मिळवणे या तांत्रिक कौशल्यात आम्ही पिछाडीवर आहोत. हळूहळू आम्ही ही शैलीही आत्मसात करू असा आत्मविश्वास आहे,’’ असेही मेराजने सांगितले.
प्रो कबड्डीला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाविषयी मेराज म्हणाला, ‘‘या खेळाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर आमच्यासाठीही हे प्रक्षेपण फायदेशीर आहे. आमच्या खेळातील गुणदोषांचा लगेचच आम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. काही प्रेक्षक माझी स्वाक्षरी घेतात, तर काही प्रेक्षक माझ्याबरोबर छायाचित्र घेतात, तो अनुभव संस्मरणीय असतो.’’
इराणमध्ये कबड्डीला किती प्रतिसाद मिळतो, यावर मेराज म्हणाला, ‘‘आमच्याकडे फुटबॉलची लोकप्रियता अफाट आहे. कबड्डीला हळूहळू लोकप्रियता मिळू लागली आहे. मात्र आम्ही खेळाचा निखळ आनंद घेण्या साठीच हा खेळ खेळतो.’’
प्रो कबड्डी लीग फायदेशीर -मेराज शेख
आशियाई स्तरावरील कबड्डी स्पर्धामध्ये भारतापुढे इराणचेच नेहमी आव्हान असते
Written by लोकसत्ता टीम
![प्रो कबड्डी लीग फायदेशीर -मेराज शेख](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/02/spt06.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 17-02-2016 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league profitable says sheikh meraj