ज्ञानेश भुरे
पुणे : अखेरच्या सेकंदाला हरयाणा स्टीलर्सच्या चढाईपटूची पकड करताना पुणेरी पलटणचा एक बचावपटूही बाहेर गेला. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील हरयाणाविरुद्धच्या रंगतदार सामन्यात पुणेरी संघाला २७-२७ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. अन्य एका सामन्यात तमिळ थलायवाजने जयपूर पिंक पँथर्सचा ३८-२७ असा पराभव केला.
सामना संपण्यास पाच मिनिटे असताना पुणेरी पलटणवर लोण देण्याची संधी हरयाणाने अचूक साधली. या लोणनंतर २२-२४ अशा पिछाडीनंतरही पुणेरी संघाने २३-२६ अशी आघाडी मिळवली. मात्र, दीड मिनिट बाकी असताना मनजीतने बोनससह मिळालेल्या दोन गुणांनी हरयाणा संघाने २६-२६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या सेकंदाला तिसऱ्या चढाईच्या नियमात हरयाणा अडकले होते. त्यात त्यांच्या चढाईपटूची पकड झाली. मात्र, पुण्याच्या खेळाडूंचा जोर आणि वेग त्यांना महागात पडला. चढाईपटूला बाहेर ढकलताना पुणेरी संघाचा एक बचावपटूही बाहेर गेल्याचे निर्देशित करत पंचांनी दोन्ही संघांना एकेक गुण बहाल केल्यामुळे सामना २७-२७ असा बरोबरीतच राहिला. पुणेरीकडून मोहित गोयतने सर्वाधिक ११ गुण नोंदवले. दिवसातील अखेरच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाजवर ३४-२९ अशी मात केली.