गल्लीपासून दिल्लीपर्यंत इतकेच नव्हे तर आणखीसुद्धा काही देशांमध्ये सध्या ‘कबड्डी.. कबड्डी..’ हा एकच नाद घुमतो आहे. कबड्डीचे हे अनोखे गारूड सर्वच वयोगटांच्या नागरिकांमध्ये अधिराज्य गाजवू लागले आहे. छोटय़ा मुलांमध्येही आता ‘चला कबड्डी खेळू या’ असा उत्साह दिसत आहे. राकेश कुमार, अनुप कुमार, मनजीत चिल्लर, जसबीर सिंग अशा खेळाडूंची नावे कबड्डीप्रेमींच्या ओठांवर रूळू लागली आहेत. सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे हे कबड्डीपटू महिनाभरात ‘स्टार’ झाले आहेत. जसबीरसारखी ‘बॅककिक’, काशिलिंग आडकेची झेप, मनजीतची पोलादी पकड यांवर चर्चा घडत आहेत. इंग्लिश भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या भारताने एकदिवसीय मालिका जिंकली, क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले; परंतु त्याचे कौतुक करण्यासही जणू कोणाला वेळ नाही.. ही सारी किमया साधली ती प्रो-कबड्डी लीगने. महाराष्ट्राच्या मातीशी नाते सांगणाऱ्या कबड्डीचे हे यश सर्वानाच आश्चर्यचकित करणारे आहे. कारण अनेक क्रीडाप्रकारांत आयपीएलप्रमाणेच फ्रेंचायझीवर आधारित लीगचा प्रयोग झाला. पण हॉकी, बॉक्सिंग, बॅडमिंटन लीगलाही जो प्रतिसाद मिळाला नाही, तो कबड्डीला मिळाला.
२०११ मध्ये कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) झाली होती; परंतु ती अपयशी ठरली. पण नापास झालेल्या मुलाने एखाद्या निष्णात शिक्षकाचे मार्गदर्शन घेऊन चक्क प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हावे, असेच काहीसे कबड्डीच्या बाबतीत घडले. येथे हे निष्णात शिक्षक म्हणजे मशाल स्पोर्ट्सचे चारू शर्मा आणि उद्योगपती आनंद महिंद्रा आहेत. देशोदेशीचे खेळाडू, उद्योग व चित्रपट क्षेत्राशी निगडित संघमालक, खेळाला वेग देऊन सामन्यांची रंगत वाढवणारे नियम व १४ कॅमेऱ्यांसह कबड्डीचे बारकावे घरोघरी पोहोचवणारे स्टार स्पोर्ट्सचे सुरस आणि सरस प्रक्षेपण. नेमक्या याच गोष्टींचा केपीएलमध्ये अभाव होता, म्हणून ती अपयशी ठरली.
नियमांमुळे सामन्यात रंजकता
दमसास हा कबड्डीचा आत्मा कुठे तरी हरवल्याची खंत अनेक जण नियमांची चर्चा करताना व्यक्त करतात. चढाईचा नियम वेळेशी बांधिल. ३० सेकंदांच्या चढाईत खेळाडूच्या वाटय़ाला प्रत्यक्षात येतात ते २० सेकंद. कारण उरलेल्या दहा सेकंदांमध्ये काऊंटडाऊन सुरू होते आणि परतीचा प्रवासही. पण थर्ड रेड अणि सुपर कॅचसारखे नियम प्रो-कबड्डीच्या सामन्यांमधील रंगत वाढवणारे ठरले. एकतर्फी निकाल लागल्याची उदाहरणे त्यामुळे खूपच कमी होती. वेळाखाऊ धोरण अवलंबणाऱ्या वांझोटय़ा चढायांचे प्रमाण नगण्यच आढळले. आता हेच नियम येत्या काही दिवसांत अंमलात येऊ शकतील. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळ्यांवरही कबड्डीचा थरार पाहायची संधी मिळेल. प्रो-कबड्डीतील उपांत्य आणि अंतिम सामन्यात डीआरएस (पंच पुनर्आढावा प्रक्रिया) प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात आले. भारतीय क्रिकेटला जे जमले नाही ते कबड्डीने करून दाखवले.
दुखापतींचे आव्हान
आयपीएल स्पध्रेनंतर होणाऱ्या दुखापतींमुळे या स्पध्रेबाबत (इंडियन नव्हे तर) इंज्युरी प्रीमियर लीग असे उपहासाने म्हटले जायचे. प्रो-कबड्डीत प्रत्येक संघाला १४ ते १६ सामने वाटय़ाला आले. त्यामुळे राकेश कुमारसहित अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. प्रो-कबड्डीनंतर काही दिवसांतच भारतीय संघातील खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पध्रेच्या महत्त्वाच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. पुढील हंगामापासून महिलांचीसुद्धा प्रो-कबड्डी होणार आहे. परंतु प्रो-कबड्डीच्या तारखा निश्चित करताना आंतरराष्ट्रीय आव्हानांचा विचार झाल्यास ही समस्या सुटू शकेल. परंतु दुखापती हा कबड्डी या खेळाचा स्थायीभाव आहे आणि या लीगमध्ये खेळाडूंना दर्जेदार सराव मिळाला, याकडे मात्र संयोजक लक्ष वेधतात.
महाराष्ट्राला काय..?
 प्रो-कबड्डीतून महाराष्ट्राला काय मिळाले?.. तर राज्यातील १४ कबड्डीपटूंना या लीगमध्ये खेळायची संधी मिळाली. महाराष्ट्राची सध्याची कामगिरी पाहता ही आकडेवारी चांगलीच आहे. या खेळाडूंवर लागलेली घसघशीत बोली आणि व्यावसायिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंसोबत खेळायची संधी याची फळे महाराष्ट्राला भविष्यात नक्कीच दिसून येतील. नितीन मदने, काशिलिंग आडके, रिशांक देवाडिगा, प्रशांत चव्हाण या खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवली. महाराष्ट्राला मात्र संघटनात्मक पातळीवर जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची खंत वाटते आहे. प्रो-कबड्डीत महाराष्ट्रातील दोन संघ सहभागी झाले होते. मुंबई-पुणेसारख्या आर्थिक रसद मिळवून देणाऱ्या शहरांमध्ये झालेले सामने कबड्डीला कॉर्पोरेट क्षेत्राचे पाठबळ मिळवून देणारे ठरू शकतील. भारतातील सर्वात जास्त व्यावसायिक संघ मुंबईत आहेत; परंतु गेली काही वष्रे कायमस्वरूपी नोकऱ्यांची समस्या येथे तीव्रतेने भेडसावते आहे. तुटपुंज्या कालावधीचे कंत्राट, शिष्यवृत्ती आदी स्वरूपात खेळाडूंना संघात स्थान दिले जात आहे. त्यामुळे एके
काळचे गाजलेले संघ आता खस्ता खात आहेत. एके काळी वैभवाचे दिवस दाखवणाऱ्या बँकांचे संघ आता नामशेष होऊ लागले आहेत. याची जबाबदारी घ्यायला मात्र कुणीही तयार नाही.
अव्वल राष्ट्रीय स्पध्रेत महाराष्ट्राच्या कामगिरीची चौकशी करणाऱ्या समितीने आपला अहवाल सादर करून बरेच दिवस लोटले; परंतु यात असे काय दडले आहे की, ज्यामुळे कारवाई करण्यास महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन धजावत नाही, हे कोडे अजून उलगडलेले नाही. पण प्रो-कबड्डीतून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीग लवकरच साकारेल अशी आशा बाळगायला मात्र हरकत नाही.
परदेशी खेळाडूंना माफक संधी
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासमोर आव्हाने उभी ठाकली आहेत. प्रो कबड्डीमध्ये ९६ खेळाडूंपैकी २४ खेळाडू म्हणजेच एकचतुर्थाश खेळाडू हे परदेशी होते. परंतु प्रत्यक्षात किती खेळाडू सहभागी झाले, हे मात्र स्पष्ट होत नव्हते. याचप्रमाणे किती परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आणि किती जणांनी त्याचे सोने केले, हे सारे विचार करायला लावणारे आहे. कारण भारताची कबड्डी तुलनेने या देशांपेक्षा अधिक विकसित असल्यामुळे आठही संघांनी देशातील खेळाडूंचा विचार करूनच व्यूहरचना आखली होती. त्यामुळे पुढील वर्षीपासून आयपीएलप्रमाणेच परदेशी खेळाडू अनिवार्य असल्याचा नियम आयोजकांना करावा लागणार आहे.
तात्पर्य
प्रो-कबड्डीने खेळाला संजीवनी दिली. श्रमिकांचा, गोरगरिबांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाला घराघरांमध्ये पोहोचवले. खेळाडूंची वैशिष्टय़े, सांख्यिकी यांच्यासहित खेळ सादर झाला. या स्पध्रेसाठी वापरण्यात आलेले खास मॅट स्थानिक असोसिएशन्सलाच वापरण्यासाठी दिले जाणार आहे. ही खेळासाठी चांगली गोष्ट आहे. याशिवाय आता आठही फ्रेंचायझी आपापल्या शहरांमध्ये कबड्डीसाठीची विशेष स्टेडियम्स बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या प्रयत्नात अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रिवाला, सुरेश कलपाठी, किशोर बियानी, राणा कपूर आदी दिग्गजांची पावले कबड्डीकडे वळली. आणखी काही मंडळीसुद्धा कबड्डीत गुंतवणूक करायला उत्सुक आहेत. एकंदर कबड्डीचे रूप या एका लीगने नखशिखान्त पालटून गेले आहे. कबड्डीने ऑलिम्पिकचे स्वप्न गेली अनेक वष्रे जोपासले आहे. प्रो-कबड्डीच्या यशामुळे हे स्वप्न आता फार दूर नाही, ही गोष्ट मात्र अधोरेखित करीत आहे.

Story img Loader