कबड्डीपटूंचे कौशल्य पाहण्यासाठी आलेल्या पाटणाकरांचे तिकिटांचे पैसे वसूल झाले. प्रो-कबड्डी लीगमधील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सवर ४०-३५ अशी मात केली तर पाटणा पायरट्स संघाने उत्कंठापूर्ण लढतीत आघाडीच्या स्थानावर असलेल्या यु मुंबा संघाला ३७-३७ असे बरोबरीत रोखले. बंगाल व तेलुगू यांच्यात सुरुवातीपासूनच बरोबरी पाहावयास मिळाली. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये तेलुगू संघाने विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. बंगाल संघाकडून नितीन मदानेने चतुरस्र चढायांचे १९ गुण मिळविले. त्यांचा कोरियन खेळाडू जंग कुन ली याला मर्यादित यश लाभले. त्याने चढायांचे ८ गुण कमवले. तेलुगू संघाकडून चढायांमधील राहुल चौधरी (१३ गुण) व दीपक हुडा (८ गुण) यांची लढत अपुरी ठरली. बंगालने मिळविलेल्या एकूण ४० गुणांपैकी २९ गुण त्यांनी चढाईत मिळविले तर पकडीत त्यांना आठ गुणांची कमाई करता आली. त्यांचा हा तिसरा विजय आहे. यु मुंबा संघाने पाटणा पायरट्स संघाविरुद्ध ३७-३७ अशी बरोबरी स्वीकारली. पूर्वार्धात  त्यांच्याकडे २१-२० अशी आघाडी होती. मुंबा संघाच्या अनुप कुमार (११ गुण), पवन कुमार (७ गुण) यांनी शैलीदार कामगिरी केली. त्यांनी खोलवर चढाया केल्या. पाटणा संघाच्या संदीप नरेवाल याने शेवटच्या चढाईत एका गुणाची कमाई केली व सामन्यात बरोबरी साधली. पाटणा संघाच्या संदीप नरवाल (१०) व रवी दलाल (६) यांचे चढायांचे प्रयत्न अपुरे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा